सरकारला चपराक, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Share This News

विरोधी पक्ष नेते फडणवीस यांची मागणी

मुंबईःगृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे निर्देश देऊन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. गृहमंत्री देशमुख यांनी आता तरी नैतिकतेच्या आधारे पदाचा राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्र्यांनी तो त्यांच्याकडून घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशाचे स्वागत करून फडणवीस म्हणाले की, गृहमंत्र्यांवरील आरोप हे एखाद्या राजकीय पक्षाने केलेले आरोप राहिलेले नसून उच्च न्यायालयाने प्रकरण गंभीर असल्याचे सांगत सीबीआय चौकशीचे आदेश दिलेले आहेत.त्यामुळे नैतिकता बाळगून गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे. गृहमंत्री चौकशीत निर्दोष आढळल्यास त्यांना पुन्हा मंत्री करा, असेही फडणवीस म्हणाले.
या सरकारने पोलिसांना वसुलीचे लक्ष्य देऊन राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासला, असा आरोप करून फडणवीस म्हणाले, सीबीआय चौकशी होऊच नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी सर्वानांच खोटे ठरविण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न होते. उच्च न्यायालयाने सरकारला चपराक लगावली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.