छत्तीसगड चकमक हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही- कुलदीप सिंह

Share This News

वी दिल्ली, 05 एप्रिल : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झालेत. इतक्या मोठ्या संख्येने जवान शहीद होणे हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे आरोप राजकीय लोक करीत आहेत. परंतु, छत्तीसगड चकमक हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही असे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) संचालक कुलदीप सिंह यांनी सांगितले. या चकमकीत सुमारे 25 ते 30 नक्षलवादी यमसदनी धाडल्याचे सिंह यांनी सांगितले. यासंदर्भात सीआरपीएफचे संचालक म्हणाले की, छत्तीसगड चकमकीत मोठ्या संख्येने जवान शहीद झालेत. यामध्ये डिस्ट्रिक्ट रिझव्‍‌र्ह गार्ड (डीआरजी)च्या 8, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकाच्या 7, स्पेशल टास्क फोर्सच्या 6 आणि ‘सीआरपीएफ’च्या ‘बस्तरिया’ बटालियनच्या एका जवानाचा समावेश असल्याचे आहे. नक्षल विरोधीत मोहिमेत गेल्या काही वर्षातील हे निश्चितच मोठे नुकसान आहे. परंतु, हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचा आरोप करण्यात काहीच तथ्य नाही. कारण या चकमकीत 25 ते 30 नक्षलवादी देखील ठार झाले आहेत. जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी नक्षल्यांनी 3 ट्रॅक्टर वापरल्याची माहिती पुढे आलीय. यावरून नक्षलवाद्यांचे किती नुकसान झाले याचा अंदाज येऊ शकतो असे कुलदीप सिंह यांनी सांगितले. नक्षलवाद्यांविरोधात बिजापूर जिल्ह्य़ातील तारेमच्या जंगलात 2 एप्रिलला सुरू केलेल्या मोहिमेत शेकडो जवान सहभागी झाले होते. एकाच वेळी बिजापूर जिल्ह्य़ातील तारेम, उसूर, पामेद आणि सुकमा जिल्ह्य़ातील मिनपा आणि नरसापूरम अशा 5 ठिकाणांहून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली होती. संरक्षण दलांवरील अनेक घातपाती हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी (पीएजीए) बटालियन-1चा म्होरक्या हिडमाबद्दल माहिती गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. त्याला घेरण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.