मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना कोरोनाचे नियम शिकवावे – आ. अतुल भातखळकर | The Chief Minister should teach the Corona rules to his party leaders rather than giving a dose of advice to the state

Share This News

मुंबई : ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के,  शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांच्या बाहेर जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली आहे. हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे. यातून शिवसेनेची मानसिकता काय आहे. याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची घणाघाती टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.      मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी संपूर्ण राज्याला उपदेशाचे डोस पाजल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका युवतीच्या कथित आत्महत्या प्रकरणात नाव असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी दहा हजारांपेक्षा जास्त लोक एकत्र जमवून कोरोनासाठी खुले निमंत्रण दिले. तर, दुसरीकडे कोरोना योद्धयांचे लसीकरण अद्याप पूर्ण झाले नसताना, तसेच वरिष्ठ नागरिक, बालक यांना अगोदर लस देण्याची आवश्यकता असताना सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतःला लसीकरण करून घेतले आहे. यातून शिवसेनेची स्वार्थी प्रवृत्ती दिसून येते. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून सुद्धा कोरोनाविरोधातील लसीकरण कार्यक्रमात महाराष्ट्र मागे का आहे हेच यातून स्पष्ट होते. यातही धक्कादायक बाब म्हणजे ज्या पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी निर्लज्जपणे प्रदर्शन मांडले होते. त्या पोहरादेवीच्या महतांनाच आता कोरोना झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना कोरोनाचे नियम शिकवावे, असा टोला लगावतानाच कायम दातखिळी बसल्यासारखे गप्प बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याविषयी त्यांचे काय मत आहे याचा सुद्धा खुलासा अशी आग्रही मागणी आ. भातखळकर यांनी केली आहे.     बेकायदेशीरपणे स्वतःला लसीकरण करून घेणारे ठाण्याचे महापौर, आमदार रवींद्र फाटक आणि इतर नगरसेवक तसेच वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गर्दी जमविल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी या विरोधात आंदोलन करेल असा इशारा सुद्धा आ. भातखळकर यांनी दिला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.