लष्करीबागेतील रोखला बालविवाह Child marriage of a minor girl stopped at a military garden in Nagpur
मुलीचे कुठलेही पालकत्व नसल्याची माहिती
लष्करीबागेत एक बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकार्यांना यश आले. अधिकार्यांनी विवाहासंदर्भात माहिती विचारली तेव्हा मुलीचे आई-वडील नसल्याबाबतची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुलगी ही तिच्या आजीकडे राहात होती. मात्र, आजीदेखील मुलीबाबत आवश्यक माहिती देऊ शकली नाही.
बुधवारी (ता.६ जानेवारी) रोजी, सकाळी ११ वाजता हा विवाह होणार होता. विवाहाची रितसर पत्रिकादेखील प्रकाशित करण्यात आली होती. परंतु, जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाला या विवाहाची गुप्त माहिती मिळाली होती. परंतु, मुलीच्या लग्नाचे वय अद्यापही कमी होते. यासंदर्भात जिल्हा व बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांना दिली. त्यांनी तातडीने हा विवाह रोखण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कारवाई पथक हे १0.३0 वाजता मुलीच्या घरी पोहचते झाले. घरी सर्वजन लग्न घाईत असताना पथकाने मुलीच्या जन्माचा दखला मागितला. त्यावर, मुलीकडच्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे, बालविवाह प्रतिबंधक कायदा २00६ अन्वये मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण व मुलाचे वर्य २१ वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करता येत नसल्याचे यावेळी त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, यासंदर्भात त्यांच्याकडून हमीपत्रदेखील लिहून घेण्यात आले. दरम्यान, जी अल्पवयीन मुलगी ज्या आजीकडे राहत होती. त्या आजीकडे त्या मुलीचे कायदेशीर पालकत्व नसल्याची बाब पुढे आली आहे. या मुलीला १२ वर्षाचा भाऊ देखील होता. ही मुले लॉकडाऊनमध्ये आजीकडे रहायला आली होती. या दोन्ही मुलांना पोलिस व बाल संरक्षणपथकांनी स्वत:च्या ताब्यात घेऊन काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोणातून बाल कल्याण समितीच्या आदेशाने बालगृहात पाठविले आहे.
यासंदभात पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई जिल्हा व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनत सचिन जाधव, मुश्ताक पठाण, विरोद शेंडे, सुजाता गुल्हाने, कनिष गोडबोले, पुष्पा वारके, जयश्री गिरडकर यांनी केली.
नवरदेव हा दिल्लीचा
अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणारा मुलगा हा दिल्ली येथील असल्याचे सांगण्यात आले. तो २६ वर्षाचा आहे. त्याचे नातेवाईक हे नागपूर शहरात राहतात. त्यानुसार त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्या अंर्तगत माहिती देण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत.