चिमूरजवळ अपघातात नागपूरच्या उद्योजकासह दोघे ठार
जंगल सफारीला जाताना काळाचा घाला
नागपूर : ताडोबा येथील व्याघ्रपकल्पांतर्गत जंगल सफारीकरिता जात असताना उपराजधानीतील उद्योजक कुटुंबाच्या कारला चिमूरजवळ जोरदार अपघात झाला. यात उद्योजक व एका मुलीचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अमिनेष अशोक गोयल आणि श्रेया अभिषेक गोयल रा. देशपांडे लेआऊट अशी मृतांची नावे आहेत. सोनू मोनू इंडस्ट्रीजचे संचालक अशोक गोयल (अग्रवाल) यांचा मुलगा अमिनेष, अभिषेक, त्यांचे कुटुंब आणि मुले त्यांच्या एमएच-४९, केबी-२४८९ क्रमांकाच्या कारने ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात जंगल सफारीसाठी गेले होते. मंगळवारी ते देवरीजवळील वन्य विलास रिसॉर्टमध्ये नोंदणी करून सकाळी ११.१५ वाजता चिमूरजवळून जात असताना तुकूम परिसरात भडगा नाला येथे अपघाती वळण आले. या वळणावर रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने वाहनचालक ज्ञानेश्वर वसंता नरड (३८) यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार नाल्याच्या पुलावरून खाली उलटली. यात श्रेया हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिचे काका अमिनेष यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. चालक ज्ञानेश्वर, मीनू अग्रवाल, नेहा अग्रवाल आणि ईशू अग्रवाल यांना चिमूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपुरात हलवण्यात आले. या घटनेमुळे गोयल कुटुंबावर शोककळा पसरली असून मृतांवर बुधवारी २ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.