चीन लस धोकादायक ?|China vaccine dangerous?

Share This News

हाँगकाँग : कोरोना संसर्गाच्या मुद्यावर जगभरात टीकेचा भडिमार सहन करणार्‍या चीनने आपली प्रतिमा उजळवण्यासाठी वॅक्सिन डिप्लोमसी सुरू केली. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांनाही धक्का लागण्याची शक्यता आहे. चीनमध्ये विकसित झालेली सिनोवॅक लस दिल्यानंतर एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हाँगकाँग प्रशासनने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या व्यक्तीला २६ फेब्रुवारी रोजी क्सुन चुंग स्पोर्टर्स सेंटरमधील लसीकरण केंद्रात लस देण्यात आली होती. साउथ चायना मॉनिर्ंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीला श्‍वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी क्वीन एलिजाबेथ रुग्णालयात पाठवण्यात आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काही वेळेतच कार्डीक अरेस्ट आला. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, डॉक्टरांना यश आले नाही.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा मृत्यू लसीकरणामुळे झाला की नाही, हे स्पष्ट नाही. रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी आपण सिनोवॅकची कोरोना लस घेतली असल्याची माहिती डॉक्टरांना दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मृत व्यक्तीला इतरही आजार असल्याची माहिती समोर आली. हाँगकाँग प्रशासनाने या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला श्‍वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे रविवारी १.३0 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुसर्‍या वॉर्डमध्ये नेण्यात आले. त्यांची प्रकृती वेगाने ढासळत होती. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. हाँगकाँगमध्ये मागील काही दिवसांपासून सिनोवॅक लस घेतल्यानंतर जवळपास सातजणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. लस घेतल्यानंतर वेगाने हृदयाचे ठोके वाढणे, चक्कर येणे आणि रक्तदाब वाढणे आदी तक्रारी रुग्णांनी सांगितल्या होत्या.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.