नागपुरात पकडल्या लाखोंचा सिगारेट साठा | Cigarette stocks worth lakhs seized in Nagpur

Share This News

नागपूर : संशयाच्या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या कारवाईत सुमारे ९ लाख ६० हजार रुपयांच्या सिगारेट्स जप्त केल्या. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. रविवार, २८ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.


प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रविवारी रात्री हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस ही गाडी उभी होती. त्यावेळी आरपीएफ निरीक्षक आर.एल. मीना, कॉन्स्टेबल राजेश गडपलवार, श्याम झाडोकर हे गस्तीवर होते. या गाडीच्या पार्सल व्हॅनमधू जो माल उतरविण्यात आला होता, त्याच्याजवळ एक तरुण उभा असलेला पोलिसांना दिसला. आरपीएफच्या पथकाला त्याच्यावर संशय आला. तो ज्या पार्सलजवळ उभा होता त्यातून तंबाखूचा गंध येत होता. त्यामुळे आरपीएफने त्याला विचारणा केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या तरुणाने माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी चाप आवळल्यानंतर मात्र पार्सलमध्ये सिगारेट असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पार्सल क्लार्कला बोलावून ते उघडण्यात आले. त्यात सिगारेटची १९,२०० पाकिटे होती. या पाकिटांची अंदाजे किंमत ९ लाख ६० हजार रुपये आहे. या पाकिटांसोबत अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुस्तकीम इक्बाल शेख (वय २३) आहे. तो संत्रा मार्केट रोड हज हाऊस नागपूर येथील रहिवासी आहे. या सिगारेट्सची जी पावती पार्सल कार्यालयात तयार करण्यात आली होती त्यात सिगारेटचा उल्लेखही नव्हता. पार्सलची किंमत ३० हजार रुपये दाखविण्यात आली होती. खोटी माहिती देऊन सिगारेटची वाहतूक केल्याबद्दल आरपीएफ ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप सिंह करीत आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.