काही साप चावतात तर काही चावत नाही, त्यांना ठेचायचं असतं; मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले
शिवनेरी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. यावेळी आमच्या धमण्यांमध्ये, रक्तांमध्ये शिवाजी महाराज आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही टीका केली.
शिवनेरीवर शिवाजी महाजांना मानाचा मुजरा केल्यानंतर झालेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. शिवरायांपुढे नतमस्तक व्हायला शिवजंयतीच पाहिजे असं नाही. कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरे वर्ष आहे शिवनेरीवर येण्याचे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, हृदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
मास्क ही आपली ढाल
छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका. छत्रपती दैवत का आहे. तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती.कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. पण आता कोरोनासारखा दुश्मन आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे, असं सांगतानाच साप तसे अजूनही आहे. काही साप चावतात. तर काही चावत नाहीत. त्यांना ठेचायचं असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली.
गडांचे संवर्धन करणार
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी ही भाषण केलं. दिल्लीच्या ठिकाणी राजकारण विरहित शिवजयंती साजरी केली. राष्ट्रपतींसह अनेक देशाचे राजदूत दिल्लीत शिवजयंतीला उपस्थित होते. या वर्षी मी मात्र शिवनेरीवर आलोय. राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर सिंधुदुर्ग येथे बांधले. मी त्याच वाटेवर चाललोय. गड संवर्धनासाठी काम करतोय. ठाकरे सरकारने पहिला निर्णय घेतला आणि 20 कोटी रुपये रायगड प्राधिकरणाला दिले. जगात कुठेही नाही असं सी-फोर्ड करत आहोत. बाकी फंडही आला आहे. परवानग्या मात्र बाकी आहेत. त्या लवकरात लवकर द्याव्यात, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जलदुर्गची संकल्पना राबवण्याची मागणीही केली.
घराघरात, मनामनात शिवजयंती साजरी होऊ दे
कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. कोरोना नियमांचे पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ साहेबांसमोर आज शिवजयंतीदिनी पुन्हा एकदा नतमस्तक होतो असं सांगत अजित पवार यांनी शिवरायांना मानाचा मुजरा करत त्रिवार वंदन केले.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे असेही ते म्हणाले. स्वराज्यातील मावळ्यांच्या शौर्याला, त्यागाला, राष्ट्रभक्तीला वंदन करताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे, असंही त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या युवा शक्तीला, आधुनिक मावळ्यांना वंदन करतानाच महाराष्ट्रातल्या तमाम बंधु-भगिंनीना, जगभरातल्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.