कलेक्टरच्या कारला धडक, पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा अटकेत Collector’s car hit, police arrested for trying to crush him

Share This News

नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारला धडक देणारा व त्यानंतर रिंगरोडवरील शताब्दी चौकात वाहतूक पोलिसाला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या कारचालकाला अजनी पोलिसांनी गोंदियातील डुग्गीपार येथे अटक केली.
संदेश भोयर (वय ३८, रा. शताब्दीनगर) हे गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिस रेकॉर्डमध्ये त्याची तो कुख्यात आरोपी म्हणून नोंद आहे. त्याच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, विनयभंगासह दोन डझन गुन्हे दाखल आहेत. शनिवारी सकाळी वाहतूक पोलिस नितीन वरठी शताब्दी चौकात ड्यूटीवर तैनात होते. ओंकारनगर चौकाकडून शताब्दीनगर चौकाकडे पांढऱ्या रंगाची कार वेगात येताना वरठी यांना दिसली. चालकाने सिग्नल तोडला. वरठी यांनी कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने कारचा वेग वाढवून वरठी यांना धडक दिली. वरठी बाजूला फेकले गेले व जखमी झाले. नंबरप्लेट नसलेली या कारसह चालक पसार झाला. वरठी यांना ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेत कारचालकाला हुडकून काढण्याचे निर्देश दिले. पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अजनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. शताब्दीनगर चौकातील एका गल्लीतून कार आल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संदेशची ओळख पटली. पोलिसांनी त्याचा मोबाइल क्रमांक मिळविला. संदेशचे लोकेशन काढले. तो डुग्गीपार येथे असल्याचे कळताच पोलिसांचे पथक तेथे गेले. संदेशला अटक करून नागपुरात आणले. संदेशने ३ मार्चला प्रतापनगर चौकातील शोरूममधून कार चोरी केली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी सिव्हिल लाइन्समधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर ५ मार्चला त्याने लॉ कॉलेज चौकातही एका कारला धडक दिली. पकडले जाऊ, या भीतीने त्याने वरठी यांना धडक देत पलायन केले होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.