नागपुरातील व्यावसायिक देतोय ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन

Share This News

नागपूर : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नागपुरातील एका उद्योजकानं माणुसकीचा असाच आदर्श घालून दिला आहे. प्यारे खान नामक या उद्योजकानं नागपूर व परिसरातील सरकारी रुग्णालयांना आठवड्याच्या आतच सुमारे ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे कर्तव्यभावनेतून त्यांची ही सेवा सुरू आहे.
प्यारे खान हे नागपुरातील आघाडीचे उद्योजक आहेत. नव्वदच्या दशकात नागपूर रेल्वे स्थानकाबाहेर संत्री विकणारे खान आता मोठे वाहतूकदार म्हणून ओळखले जातात. पोटापाण्यासाठी त्यांनी पूर्वी रिक्षाही चालवली होती. खान यांच्या आश्मी रोड करिअर्स प्राइव्हेट लिमिटेड या कंपनीकडं तब्बल ३०० ट्रकचा ताफा असून त्यांच्या कंपनीचे बाजारमूल्य ४०० कोटी इतके आहे. गरिबीतून वर आलेल्या प्यारे खान यांना तळागाळातील परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. या जाणिवेतूनच जीवनमरणाशी झुंजणाऱ्या करोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. नागपूर जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या वतीनं सध्या ते स्वत: ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था पाहत आहेत. आठवडाभरात प्यारे खान यांच्या कंपनीनं करोना रुग्णांना ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या खिशातून तब्बल ८५ लाख रुपये खर्च केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या ३६० सिलिंडरसह एकूण ८६० सिलिंडर त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांना पुरवले आहेत. रायपूर, रुरकेला व भिलई येथे टँकर पाठवून, तिथून ऑक्सिजन भरून घेऊन तो नागपूर व आसपासच्या परिसरात पुरवण्याचं काम ते करत आहेत. प्यारे खान यांच्या या कामाचा पूर्ण मोबदला देण्याची तयारी प्रशासनानं दर्शवली आहे. मात्र, हे पैसे न स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रमझानच्या पवित्र महिन्यातील ही ‘जकात’ आहे. हे माझं कर्तव्यच आहे. मानवतेची ही सेवा आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.