सचिन वाझे प्रकरणावरून विधिमंडळात गोंधळ Confusion in the legislature over the Sachin Waze case

Share This News

मुंबई : महाराष्ट्र हे काय आत्महत्या डेस्टिनेशन होणार का? सचिन वाझे यांना कोण पाठीशी घालत आहे? असा सवाल करीत विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री कोणत्याही सभागृहात येऊन निवेदन का करीत नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला. त्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवार, ९ मार्चला गोंधळ झाला.


सचिन वाझे यांना पदावरून दूर करण्याबाबत मंत्र्यानी कबुली दिली आहे. त्यानंतरही त्यांना सरकार दूर करीत नाही. त्यामुळे सरकारवर कोणाचा दबाव आहे हे सरकारने सांगितले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर प्रत्यारोप करताच विरोधी पक्षाचे आमदार संतप्त झालेत. घोषणाबाजीमुळे सभागृहातील गोंधळ आणखी वाढला. त्यामुळे कामकाज काही वेळेसाठी स्थगित करण्यात आले. दुपारी चारच्या सुमारास विधान सभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र सभागृहात त्यावेळीही नारेबाजी सुरू होती. त्यामुळे विधान सभेचे कामकाज बुधवार, १० मार्चला सकाळपर्यंत तहकुब करण्यात आले. विधान परिषदेतही अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांना सभागृहात येण्याची विनंती केली. मात्र विरोधी आमदारांची प्रतीक्षा न करताच सभपतींची विधान परिषदेचे कामकाज दुपारी चार वाजताच्या सुमारास २० मिनिटांसाठी तहकुब केले. या मुद्द्यावर बोलताना माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारला कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चाच करण्याची ईच्छा नाही. त्यामुळे ते सभागृह तहकुब करीत पळ काढत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सरकारवर टीका केली. ते म्हणाले, वैधानिक विकास मंडळांची स्थापना, सर्व प्रदेशांना समान न्याय देणारा अर्थसंकल्प, महिलांचा सन्मान आणि आता वाझे प्रकरणावर सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरलेले नाही.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.