कोरोना काळात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल राज्यपालांची वैद्यकीय विद्यार्थी, स्नातकांना शाबासकी

Share This News

 मुंबई, २९ जानेवारी, : कोरोना संक्रमणाच्या काळात वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी, आंतरवासीय डॉक्टर्स व प्रशिक्षित डॉक्टरांनी रुग्णसेवा देण्याची बहुमोल कामगिरी केली असे सांगून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज वैद्यकीय शाखेतील स्नातकांना, विद्यार्थ्यांना तसेच डॉक्टरांना कौतुकाची थाप दिली. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा व‍िसावा दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत शुक्रवारी (दि. २९) ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. आपल्या दीक्षांत भाषणात राज्यपाल म्हणाले, सर्वत्र परीक्षा नको असा सूर असताना वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांनी निष्ठेने अभ्यास केला, परीक्षा दिल्या व लगेचच रुग्णसेवा कार्यात स्वतःला झोकून दिले. हे त्यांचे कार्य शब्दातीत होते. या कार्यात वैद्यकीय शिक्षकांनी देखील सहकार्य केले. सर्व वैद्यकीय परीक्षा वेळेवर घेऊन तसेच त्यांचे निकाल वेळेत लावल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे कौतुक केले. एकीकडे आरोग्य सेवा व वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन होत असताना जगभरात करोनासारखे नवनवे आजार देखील येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय शाखेतील स्नातकांनी सर्व प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. आज जगभरात योग तसेच आयुर्वेदाबद्दल लोकांमध्ये कमालीचे औत्सुक्य आहे. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना अंतर-शाखीय (इंटर डीसिप्लीनरी) अभ्यास करण्याची सुविधा असावी, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी विविध वैद्यकीय विद्याशाखांमधील ८०६४ स्नातकांना पदवी, पदविका, पदव्युतर पदवी, पीएच.डी. तसेच प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.