काँग्रेस आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हिवाळी अधिवेशनावर होणारा खर्च नागपुरातील आरोग्य यंत्रणेला द्या, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत घेतलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कांग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. हिवाळी अधिवेशनावर होणारा खर्च नागपुरातील आरोग्य यंत्रणेला द्या, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.
येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मात्र कोरोनामुळे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी हे अधिवेशन नागपुरात घेऊ नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे हे अधिवेशन मुंबईत घेण्याबाबत चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान हे अधिवेशन मुंबईत होणार असल्याने साधारण 50 कोटी खर्चाची बचत होणार आहे. त्यामुळे हे बचत झालेले 50 कोटी हे नागपुरातील आरोग्य यंत्रणाला द्यावे, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.
“प्रशासनाने हिवाळी अधिवेशनावर 50 कोटींचा खर्च प्रस्तावित केला होता. पावसाळी अधिवेशन हे तीनच दिवस चालले होते. परिणामी उपराजधानीत हिवाळी अधिवेशन हे किमान दोन आठवडे चालणार असा अंदाज बांधून ५० कोटींचा खर्च प्रस्तावित केला होता. परिणामी 7 डिसेंबर ते 18 डिसेंबरपर्यंत होणारे हे अधिवेशन आता स्थगित झाले असल्याने प्रशासनाचा 50 कोटींचा खर्च वाचला आहे.”
“तो संपूर्ण पैसा आता नागपूर तसेच विदर्बातील रुग्णांच्या आरोग्य व्यवस्थापनावर खर्च करण्यात यावा. येत्या जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनावर खर्च होणारा जवळपास 50 कोटींचा संपूर्ण खर्च आता विदर्भाच्या नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी खर्च करण्यात यावा. ही रक्कम नागपुरातील नवीन रुग्णालय तसेच आरोग्य यंत्रणांवर खर्च करण्यात यावा”, अशी मागणी विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान नागपुरात सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पण कोरोनामुळे अधिवेशन होणार की नाही, याचा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. पण सध्या नागपुरात अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार निवासात रंगरंगोटी सुरु झाली आहे.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी अधिवेशनासाठी आमदार निवासात रंगकाम करण्यात आले होते. त्यासाठी जवळपास पावणे दोन कोटींचा खर्च करण्यात आला होता. यंदाही यासाठी आठ कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. संच अधिवेशनादरम्यान कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय करण्यात आली आहे. मात्र हिवाळी अधिवेशन नेमकं कुठे होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.