पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आमदारांचा सायकल मोर्चा ! |Congress MLAs’ cycle march against petrol-diesel price hike!

Share This News

मुंबई–पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईत सायकल मोर्चा काढला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात काँग्रेसचे मंत्री व आमदारांचा सहभाग होता. दरम्यान काँग्रेस आमदारांची सायकल रॅली विधानभवनाजवळ पोहचताच काँग्रेस आणि भाजप आमदारांत घोषणाबाजी झाली. काँग्रेसच्या आमदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात तर भाजप आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधी घोषणा दिल्या.

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या आमदारांनी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सायकल मोर्चा काढला. मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन करुन सायकलवरुन विधानभवनाकडे निघाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील, भाई जगताप आदींचा समावेश होता. जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदारही सायकल मोर्चात सहभागी झाले. इंधन दरवाढीवरुन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. पटोले म्हणाले, ‘ मोदी सरकारच्या कालावधीत महागाईचा विक्रम झाला आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं अवघड बनले आहे. केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या तोंडातील घास हिरावून घेत आहे. काँग्रेसतर्फे महागाईविरोधात देशभर आंदोलन सुरू आहे.’

सायकल मोर्चा म्हणजे मिडिया इव्हेंट, निव्वळ फार्स- देवेंद्र फडणवीस

काँग्रेसच्या सायकल मोर्चावर भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले,‘काँग्रेसचा सायकल मोर्चा हा प्रसिद्धी मिळवण्याचा मिडिया इव्हेंट आहे. आंदोलनाचा हा निव्वळ फार्स आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोलवर २७ टक्के कर लावला आहे. देशातील अनेक राज्यात महाराष्ट्रापेक्षा कमी दराने पेट्रोल मिळते. काँग्रेसचे हे आंदोलन हे केंद्राविरोधात नव्हे तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात असावे. राज्याचा २७ टक्के कर कमी करावा यासाठी त्यांनी मोर्चा काढला असावा.’


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.