वैयक्तिक जीवनात, सार्वजनिक व्यवहारात मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवूया – अजित पवार | Consciously increase the use of Marathi language in personal life, in public affairs – Ajit Pawar

Share This News

आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला, जगभरातील मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्ताने शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी आहे. मराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता माळी, संत नरहरी सोनार यांच्यासारख्या संतांनी त्यांचे अलौकिक विचार मराठी भाषेत मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेशी मराठीतंच संवाद साधला. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी त्यांच्या साहित्यकृतींतून मराठी भाषा समृद्ध केली. गावखेड्यातल्या बोलीभाषांनी मराठीचं सौंदर्य अधिक वाढवलं,असे ते म्हणाले.

आज बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी, देशात तिसऱ्या आणि जगात दहाव्या क्रमांकावर आहे. अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. हे करत असतानाच मराठी भाषेची उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मराठी ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे. जागतिक स्तरावर संपर्क, संवाद, व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळालं पाहिजे. संगणकाच्या आज्ञावली मराठीत विकसित झाल्या पाहिजेत, असेही अजित पवार म्हणाले.

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच औद्योगिक, आर्थिक, न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकानं स्वत:पासून, वैयक्तिक जीवनात, व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करुन करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.