नागपूर : नगर विकास मंत्रालयाच्या ४ डिसेंबरच्या आदेशानुसार काटोल नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १८ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी स्थगिती दिली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह नगरसेवकांवर आर्थिक अपात्रतेचा ठपका ठेवला होता. न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेश पारित करून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व इतरांना सहा आठवड्यामध्ये याप्रकरणी उत्तर मागितले. यामुळे नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, सत्तापक्ष नेते चरणसिंह ठाकूर, नगरसेवक मीराबाई उमप, श्वेता डोंगरे, किशोर गाढवे, शालिनी बनसोड, माया शेरेकर, राजू चरडे, लता कडू, सुभाष कोठे, संगीता हरजाल, सुकुमार घोडे, वनिता रेवतकर, देविदास कठाणे, शालिनी महाजन, प्रसन्ना श्रीपतवार, जयश्री भुरसे, मनोज पेंदाम, हेमराज रेवतकर, तानाजी थोटे यांना दिलासा मिळाला. याचिकाकर्त्यांतर्फे मोहित खजांची, महेश धात्रक यांनी बाजू मांडली. |