आत्मनिर्भर भारतासाठी योगदान द्या
नवी दिल्ली |
अलिकडे देशात नवीन कल निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार बाहेरच्या बहुराष्ट्रीय गोष्टींचा भारतात तितका स्वीकार केला जात नाही मात्र भारतीयांच्या बहुराष्ट्रीय बनण्याला प्राधान्य दिले जात आहे. संकटाच्या काळामध्ये दुसर्या आणि तिसर्या दर्जाच्या शहरांमध्ये स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न पहिल्यापेक्षा तिप्पट वेगाने निर्माण होत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये झपाट्याने सुधारणा होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची म्हणजे कारकीर्दीची आखणी करताना देशाच्या आकांक्षापूर्तीचा विचार करा आणि आत्मनिर्भर भारतासाठी योगदान द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवीन दशकामध्ये ब्रँड इंडियाला संपूर्ण जगभरामध्ये मान्यता मिळवून देणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आयआयएम संबलपूरच्या स्थायी परिसराचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी केला. आयआयएम संबलपूरचा स्थायी परिसर ओडिशाची संस्कृती आणि स्त्रोत यांचे फक्त दर्शन घडवणाराच आहे असे नाही तर, व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये ओडिशाला जागतिक मान्यता मिळवून देणारा आहे. स्थानिक गोष्टींना जागतिक पातळीवर नेण्यामध्ये विद्यार्थी अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. संबलपूर परिसरातल्या स्थानिक गोष्टींमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने असलेल्या अपार संभावना लक्षात घेऊन त्यावर विद्यार्थ्यांनी काम करावे. संबलपूरची स्थानिक उत्पादने, स्थानिक हस्तकला, वस्त्रोद्योग आणि आदिवासी कला यांना जागतिक बाजारपेठ निर्माण कशी करता येईल, याचा विचार करावा. तसेच इथल्या खनिज संपत्तीचे आणि या क्षेत्रातल्या इतर स्त्रोतांचे अधिकाधिक उत्तमतेने व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल, याचा विचार करावा. हे करतानाच आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये योगदान देणे सर्वांना शक्य होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. आत्मनिर्भर मोहिमेमध्ये लोकल गोष्टी ग्लोबल करताना आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी नवसंकल्पनाचा शोध घेण्याची आणि स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बनविण्यासाठी सेतू निर्माण करण्याचे कार्य करावे. आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी व्यपस्थापनाची कौशल्ये विकसित करताना नवसंकल्पना, एकात्मता आणि सर्वसमावेशकता यांचा मंत्र म्हणून वापर करावा, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आजच्या युगामध्ये व्यवस्थापन क्षेत्रातल्या नवीन आव्हानांविषयी आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मिर्श छपाई, बदलते उत्पादन तंत्रज्ञान, पुरवठा साखळी यांच्यावर प्रकाश टाकला. या नवीन तंत्रज्ञानामध्ये डिजिटल संपर्क यंत्रणा आणि कुठूनही काम करण्याची संकल्पना आता आली आहे, त्यामुळे संपूर्ण जग आता एका जागतिक खेड्यामध्ये रूपांतरीत झाले आहे. गेल्या काही महिन्यात भारतानेही या नव्या जगाप्रमाणे वेगाने सुधारणा घडवून आणल्या आहेत. असे बदल करण्याचे किंवा फक्त स्वीकारण्याचे काम भारताने केले नाही तर सर्वांना मागे टाकण्याच्या अपेक्षा ठेवून प्रयत्न केले आहेत, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. काम करण्याची बदलती शैली लक्षात घेता त्यांचा व्यवस्थापन कौशल्यांवर आणि मागण्यांवरही परिणाम होत आहे. टॉप -डाउन किंवा टॉप- हेवी व्यवस्थापन कौशल्याची जागा आता सहयोग, नवसंकल्पना आणि परिवर्तनात्मक व्यवस्थापनाने घेतली आहे. सांगकामे आणि विशिष्ट-नियत कार्यपद्धतीची जागा आता तांत्रिक व्यवस्थापनाने घेतली आहे, त्याचबरोबर मानवी व्यवस्थापनालाही समान महत्त्व आले आहे. |