विरोधकांच्या दबावानंतर वादग्रस्त पोलिस अधिकारी

Share This News

सचिन वाझे यांना अखेर गुन्हे शाखेतून हटवले

मुंबईः मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई गुन्हे शाखेतून हटविण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत वाझे यांना गुन्हे शाखेतून हटविण्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेनेने समाधान न झाल्याने भाजपच्या आमदारांनी परिषदेत गोंधळ घालत वाझे यांच्या अटकेची मागणी केली.
विरोधकांच्या मागणीनुसार वाझे यांना मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास तसेच गुन्हे शाखेतून हटविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देताना गृहमंत्री देशमुख यांनी विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असल्यास ते त्यांनी एसीएसकडे द्यावेत, असेही सांगितले. या प्रकरणात एटीएस कोणालाही पाठिशी घालणार नाही. सचिव वाझे किंवा कोणाचाही जावई असो, कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, गृहमंत्र्यांच्या घोषणेने विरोधकांचे समाधान झाले नाही. सचिन वाझे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीचा पुनरूच्चार करीत भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला. कारवाई झाल्याशिवाय परिषदेचे कामकाज चालू दिले जाणार नसल्याचा इशारा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
मंगळवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले. हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच त्यांनी सभागृहात वाचून दाखविला. वाझे यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. विरोधकांच्या दबावानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वाझे यांना गुन्हेशाखेतून तसेच तपासातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.