‘नागपूर मेडिकल’च्या ३० डॉक्टर्स, ३ नर्सना कोरोना
नागपूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ३० डॉक्टर्स आणि ३ नर्सेसना कोरोनाची लागण झाली आहे. मेडिकलमधील एकूण ३८ आरोग्य सेवकांना संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे.
डेन्टलच्या ९, एमबीबीएसच्या १२, पदव्युत्तर पदवीच्या ९ आणि ३ नर्सेसचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी काही जणांना गृह विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. इतरांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले सर्व आरोग्य सेवक विविध राज्यांशी संबंधित आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मेडिकलमधील वसतिगृह सॅनेटाइझ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मेडिकलचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी ही माहिती दिली. शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुणे, नाशिक, अमरावती, वर्धा, मुंबई, नागपूर येथे कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रतिबंध अधिक कडक करण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. यापैकी काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागूही करण्यात आली आहे.