कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला; अभिनेता अमोल धावडेंच्या निधनावर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट

Share This News

मुंबई : राज्यात ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्णांचा जीव जातोय. अशात मराठी चित्रपटसृष्टीतही आता शोकाकळा पसरली आहे. अभिनेते अमोल धावडे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. अवघ्या 15 दिवसात झालेल्या कोरोना संक्रमणानं त्यांचा मृत्यू झालाय.

प्रवीण तरडेंनी दिली माहिती

अभिनेते दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. अभिनेते अमोल धावडे हे प्रवीण तरडे यांचे जवळचे मित्र होते. देवूळबंद , मुळशी पॅटर्न या चित्रपटांमध्ये ते झळकले आता तरडेंच्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातही त्यांचा सीन असल्याची माहिती आहे.

प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट

‘माझा मित्र अमोल धावडे गेला, कोरोनानं आज एक निर्व्यसनी रोज व्यायाम करणारा धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या 15 दिवसात खाल्ला. किती आठवणी ..? 1996 साली मी लिहिलेल्या “आणखी एक पुणेकर ” या एकांकीकेत पहिला डायलॅाग याने म्हटला होता म्हणुन, माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचोच.. देवूळबंद , मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव प्रत्येक सिनेमात अमोल आहेच .. 11 मे ला अमोलचा वाढदिवस म्हणुन तिन्ही सिनेमांचं डबिंग आत्ता पर्यन्त त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॅाग ने सुरू करायचो .. हा माझा एक श्रध्देचा भाग होता.. खुप मोठा बांधकाम व्यवसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा .. 1999 साली आपण पुरुषोत्तम जिंकला तेंव्हा तु कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा .. एकत्र नॅशनल खेळलो , एकांकीका केल्या , सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास .. तुझा शेवटचा मेसेज होता ” बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव ” राहिलाच शेवटी .. डोळ्यातील पाणी थांबत नाही ये रे आमल्या .. जिथे कुठे असशील सुखी राहा .. नाही तरी मी आणि पिट्या तुला “सुखी जीव “ असच म्हणायचो की .. सुखी राहा .. कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा.’

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी अमोल धावडे यांना श्रद्धांजली दिली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.