कोरोना वाढतोय; होळी आणि धुलीवंदनाच्या सुटीला घरातच रहा – मंत्री डॉ. नितीन राऊत

Share This News

नागपूर दि. २७ :- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून यंदा सार्वजनिक होळी आणि धुलीवंदन सार्वत्रिक साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. काल शुक्रवारला जिल्हातील कोरोना बाधिताची संख्या ४ हजारावर पोहचली आहे. अशा वेळी होळी व धुलीवंदन उत्सव नागरिकांनी अत्यंत साधेपणाने, घरामध्येच साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
अर्थचक्र बंद होऊ नये म्हणून काही सवलती देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये याची देखील काळजी घेतली जात आहे. मात्र बाहेर पडण्यासाठी कोणतेही कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. गेल्या वर्षभरात आतापर्यंत एकट्या नागपूर जिल्हयामध्ये ४ हजार ७८४ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या अचानक वाढल्यास वैद्यकीय यंत्रणेवर देखील ताण येऊ शकतो. नागपूर शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट तयार झाले आहे. अशावेळी कोरोना प्रोटोकॉल पाळणे गरजेचे असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यासाठी सहकार्य घरात राहून करणे आवश्यक आहे. मास्क लावणे, शारिरीक दूरी पाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असून उपाययोजना करण्यासाठी दररोज आढावा घेतला जात आहे. प्रशासन आपले काम करीत आहे. मात्र जनतेनेही या काळात सहयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या कालावधीत नागरिकांनी देखील चाचणी आणि लसीकरणासाठी सहकार्य करतानाच रस्त्यावरील गर्दी कमी होईल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रशासनाचे निर्देश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी यंदा होळी, धुलीवंदन तसेच शब-ए-बारात उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावे. या उत्सवांच्या निमित्ताने मिरवणूक काढता येणार नाही. कोरोना प्रतिबंधक नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये. मोठ्या स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. दूध विक्री व पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री, किराणा दुकाने, चिकन, मटण ,अंडी व मांस दुकाने, वाहन दुरुस्ती, पशुखाद्य दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेश काल रात्री प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच भारतीय दंड संहिता कलम १८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.