महाराष्ट्रात “बाहेरील” लोकांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली!

Share This News

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची टीका, मंत्री चुकीचे वागले म्हणून आले राजीनामे

मुंबईः महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे कारण म्हणजे बाहेरून येणारे लोक आहेत. औद्योगिक राज्य असल्याने बाहेर येणाऱ्या लोकांमुळेच महाराष्ट्रात हे प्रमाण वाढलेले असून इतर राज्यात रुग्ण मोजले जात नसल्याने तेथील परिस्थितीची कल्पना येत नाही, असा दावा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज यांच्याशी संवाद साधून कोव्हीड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राज यांनी महाराष्ट्रातील संसर्ग वाढीमागे नेमके हे कारण सांगितले.मुख्यमंत्री ठाकरे यांना समक्षमच भेटून बोलणार होतो. मात्र, त्यांच्या आसपास अनेक रुग्ण विलगीकरणात असल्याने झूमवर संवाद साधावा लागला, असे ते म्हणाले. राज्यात पुन्हा परतणाऱ्या कामगारांची मोजणी करून त्यांच्या चाचण्या करण्याची सूचना आपण केली होती. ते झाले नाही, याकडे त्यांनीलक्ष वेधले.
सरकारच्या काही आदेशांमध्ये विरोधास असल्याचे सांगून राज म्हणाले, उद्योगांनी उत्पादन सुरु ठेवावे, असे सरकार सांगते. पण, उत्पादित वस्तुंची विक्री होऊ न देण्याचे सरकारचे धोरण आहे. काही दिवस तरी दुकांनाना परवानगी हवी.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उदरनिर्वाहाचे साधन उरलेले नाही. अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिले कशी भरायची हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी वीजबिल माफी द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये खाटा मिळायलाच हव्या. त्यासाठी गरज पडल्यास सरकारने कठोर धोरण स्वीकारावे, असे राज म्हणाले.
मंत्री चुकीचे वागले म्हणून राजीनामे
मंत्री चुकीचे वागले म्हणूनच त्यांचे राजीनामे घेण्याची वेळ येत आहे, असा टोला राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना हाणला. सत्त उलथविण्यासाठी असे प्रयत्न होत असल्याचे कुणी सांगत असेल तर मुळात मंत्र्यांनी असे काहीतरी केले म्हणूनच त्यांच्यावर ही पाळी आली आहे, असेही ते म्हणाले. गृहमंत्र्यांचा राजीनामा हा विषय महत्वाचा नाही. अँटिलियापुढे बॉम्ब ठेवल्याचा मुद्दा महत्वाचा असून तो कोणाच्या सांगण्यावरून आणि का ठेवला गेला, याची चौकशी महत्वाची असल्याचे राज म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.