कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढ
नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते. हे संकेत आता जिल्ह्यात सातत्याने वाढत चाललेल्या रुग्णसंख्येवरून खरे ठरते की काय असे वाटू लागले आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात कोरोनामुक्तांच्या तुलनेत पॉझिटिव्हची संख्या दुपटीने वाढत असल्याचे दिसते आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४४३ नव्या कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली असून, १२ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहर व ग्रामीण भागामध्ये दिवाळीपूर्वी नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी अनेकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची सर्रासपणे पायमल्ली झाल्याचेही दिसून आले. जेव्हा की शासनाने सण साजरे करा, परंतु कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच, असा सल्लाही दिला होता. मात्र, नागरिकांनी शासन व प्रशासनाच्या या सल्ल्याला केराची टोपलीच दाखविली व त्याचे फलित म्हणजे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात झालेल्या एकूण कोरोना चाचण्यांच्या तुलनेत ५.८२ टक्के अहवाल सकारात्मक आले होते.
मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवार, १९ नोव्हेंबरला या टक्केवारीत १.२२ टक्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. गुरुवारला शहरात ४,८५३ तर ग्रामीणमध्ये १,४४४ अशा एकूण ६,२९७ चाचण्या करण्यात आल्यात.
७.०४ टक्के म्हणजेच शहरातील ३५७, ग्रामीणमधील ८२ व इतर जिल्ह्यातील ४ अशा ४४३ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७ हजार ६५६ वर पोहचली आहे. गुरुवारला शहरातील १७० व ग्रामीणमधील केवळ ५४ अशा २२४ जणांना सुटी देण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ५९८ वर पोहचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने घटत चालले असून, ते बुधवारच्या तुलनेत पुन्हा ०.१८ टक्क्यांनी घटून ९३.४४ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या शहरातील २९५१ व ग्रामीणचे ५५७ असे ३५०८ सक्रिय रुग्ण असून, यातील १२६४ जणांना सौम्य व मध्यम लक्षणे असल्याने ते शासकीय, खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत