देशात 24 तास कोरोना लसीकरण सुरू राहणार- डॉ. हर्षवर्धन Corona vaccination will continue 24 hours a day in the country. Harshavardhana
नवी दिल्ली : देशात 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचे लसीकरण सुरू केलेय. दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन गोयल यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. देशभरातील नागरिक आता 24 तासांत कधीही आपल्या सोईनुसार लस घेऊ शकणार आहेत. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन गोयल म्हणाले की, केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरणासाठी असलेली वेळमर्यादा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिक आता दिवसाच्या 24 तासांत कधीही लस घेऊ शकतील. पंतप्रधान देशातील नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या वेळेचे महत्त्वही जाणतात. कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशभरात आतापर्यंत 1.54 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या आकडेवारीमध्ये मंगळवारी देण्यात आलेल्या 6 लाख 9 हजार 845 लसींचाही समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या तात्पुरत्या आकडेवारीमध्ये ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या विरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली होती. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि 2 फेब्रुवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सुरुवात झाली होती. त्यानंतर 1 मार्चपासून 60 वर्षांवरील व्यक्ती आणि गंभीर आजारांनी ग्रस्त 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना मंगळवारी संध्याकाळपर्यंत गोळा झालेल्या अंदाजित आकडेवारीनुसार आतापर्यंत 1 कोटी 54 लाख 61 हजार 864 जणांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 4 लाख 34 हजार 981 लाभार्थ्यांचा आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील 60 हजार 20 व्यक्तींचा समावेश आहे.