अबब! अकोल्यातून कोरोनाच्या लसी गायब

Share This News

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिरम कंपनीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या चार बाटल्या रहस्यमयरित्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील चतारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे. कोरोना लस चोरी झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. याप्रकरणी चान्नी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी लस चोरांचा शोध सुरू केला आहे.

यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, सिरम कंपनीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसींचा साठा अकोला जिल्ह्यात करण्यात आला आहे. त्यानुसार चतारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसींच्या बाटल्या पुरविण्यात आल्या. आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियमानुसार ४४ बाटल्यांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रातील फ्रिजमध्ये ठेवला होता. शासनाच्या निर्देशांनुसार कोरोना योद्ध्यांना लस देण्याची मोहिम सध्या सुरू आहे. त्यामुळे या लसींचा अन्य लोकांसाठी वापर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ठरल्यानुसार आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणास सुरुवात केली. फ्रिजमधील साठा मोजल्यानंतर केंद्रात असलेल्या ४४ बाटल्यापैकी ७ बाटल्या गायब असल्याचे लक्षात आले. ही बाब कळताच आरोग्य विभागात खळबळ उडाली. लसीच्या बाटल्या गहाळ झाल्याची माहिती तातडीने आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांनुसार याप्रकरणी आरोग्य विभागाने अकोट पोलिस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या चान्नी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोव्हिशिल्डच्या एका बाटलीत ११ मिलीलिटर औषध असते. त्यामुळे गायब झालेल्या बाटल्यांमध्ये ७७ मिलीलिटर औषध असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यापासून लसीच्या बाटल्या गहाळ होण्याचा राज्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे हा प्रकार राज्य शासनाने गंभीरतेने घेतला आहे. लसीच्या बाटल्या शोधण्याला सध्या प्राधान्य देण्यात येत आहे. चौकशीअंती याप्रकरणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.