नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस | Corona vaccine taken by Narendra Modi

Share This News

देशात आजपासून करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरण मोहिमेत सहभागी झाले असून सर्वात प्रथम करोनाची लस घेतली आहे. मोदींनी लस घेतानाचा फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी यावेळी लसीकरणासाठी पात्र देशवासियांना आवाहन केलं असून भारताला कोविड फ्री बनवूयात असं म्हटलं आहे.

लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून
पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी कमाल अडीचशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

केंद्र शासनाची ‘जन आरोग्य योजना’ राबविण्यात येणाऱ्या, तसंच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असलेल्या मुंबईतील ५३ खासगी रुग्णालयांची यादी पालिकेला प्राप्त झाली आहे. या रुग्णालयांमध्ये शासकीय नियमांनुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे संभाव्य विपरीत परिणाम, व्यवस्थापन इत्यादींसाठी सुविधा उपलब्धता या बाबींचे सर्वेक्षण करून लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतर टप्या टप्याने सदर केंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

ओळखपत्र बंधनकारक
सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यावसायिकांकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे. तर ६० वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणे आवश्यक आहे. ‘कोविन डिजिटल प्लॅटफॉर्म’ हा १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खुला करण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना स्वत: नोंदणी करता येणार आहे. मात्र कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असेही आवाहन पालिकेने केले आहे.

सध्या कार्यरत असलेल्या खासगी इस्पितळातील लसीकरण केंद्रात लसीकरण केवळ त्याच इस्पितळातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहील. राज्य शासनाकडून या संदर्भात धोरण निश्चित झाल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. अद्याप नोंदणी न झालेले आरोग्य कर्मचारी व कोविड आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांनी लसीकरण केंद्रात जाऊन आपले ओळखपत्र (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड) लसीकरण केंद्रात सादर करून आपले लसीकरण करून घेऊ शकतात, असंही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.