नागपुरातील ‘हे’ परिसर ठरू शकतात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट | Corona’s new hotspots could be ‘this’ area in Nagpur
नागपूरात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, गेल्या 24 तासात करोनाच्या नव्या 500 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी रुग्णसंख्येत तब्बल 500 रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.
नागपूरात 1 फेब्रुवारीला 218 करोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती त्यानंतर हा आकडा सातत्याने वाढत जाऊन बाराव्या दिवशी तब्बल 500 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. नागपूर शहरातील 9 परिसर पुन्हा करोना चे हॉटस्पॉट ठरू शकतात असा अंदाज महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी व्यक्त केला आहे. खामला, जयताळा, जाफरनगर, दिघोरी,स्वावलंबी नगर,अयोध्यानगर, न्यू बिडी पेठ,वाठोडा, जरीपटका या परिसराचा यात समावेश आहे. या परिसरातून पुन्हा कोव्हिड रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असून भविष्यात हे परिसर करोना हॉटस्पॉट ठरू शकतात अशी खळबळजनक माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी दिली. करोना नियंत्रणासाठी पॉजिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक असून यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. करोना बाबत वाढलेली बेफिकरी,मास्कचा वापर टाळणे, फिजिकल डिस्टनसिंग न पाळणे, सॅनिटायजरचा वापर न करणे यामुळे नागपूरात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 5 डिसेंबर रोजी 527 करोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती त्यानंतर तब्बल 66 दिवसांनी करोना रुग्णांची संख्या पाचशे वर पोहचली आहे.