‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त – दीपक म्हैसेकर

Share This News

यवतमाळ, दि. 21 : कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संपल्याचा गैरसमज करून घेतला. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नागरिक बिनधास्त वावरत आहेत. ही बाब सर्वांच्या अंगलट आली असून कोरोना विषाणू पुन्हा आपले हातपाय पसरवित आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रित करून संक्रमण रोखावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे, अशा सूचना करून श्री. म्हैसेकर म्हणाले, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. ज्या भागातून पॉझिटिव्ह रुग्ण येत आहे, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा. या भागातून कोणीही बाहेर येणार नाही, याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे. बाहेर येणारे ‘सुपर स्प्रेडर’च अधिक धोकादायक ठरू शकतात. आरोग्य पथकाद्वारे होणाऱ्या सर्व्हेक्षणाची पुन्हा पडताळणी केली पाहिजे. जेणेकरून योग्य वस्तुस्थिती समोर येईल. सर्व्हे दरम्यान संबंधितांच्या ऑक्सिजन लेव्हलची नोंद अतिशय गांभिर्यपूर्वक करा. सर्वेक्षण योग्य पध्दतीने झाले तर उपचाराची चांगली संधी असते. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल.

पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण केवळ वैद्यकीय महाविद्यालयात न ठेवता संबंधित ठिकाणच्या कोव्हीड हेल्थ सेंटर किंवा कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करा. त्यासाठी शासनाच्या सुचनेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करा. गृह विलगीकरणाची ज्यांच्याकडे उत्तम व्यवस्था असेल अशाच रुग्णांना गृह विलगीकरणाची सुविधा द्या. अन्यथा संबंधित रुग्णाला आरोग्य संस्थेत भरती करून घ्यावे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यु का होत आहे, याची कारणे शोधण्यासाठी तीन सदस्यीस समितीचे गठण करा. यात मृत्यू झालेल्यांचे वय, पूर्वव्याधीग्रस्त आहे का, उपचारासाठी उशिरा दाखल झाले का, आदी बाबींचे सुक्ष्म निरीक्षण करा. मृत्यु विश्लेषण अहवाल अतिशय गरजेचा असून जिल्हा प्रशासनाने तो चांगला तयार केला आहे, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली.

प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी : जिल्ह्याचा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी यवतमाळ शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. यात शिरे ले-आऊट आणि साईनाथ ले-आऊट चा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक डॉ. भुजबळ, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.