मनपाने १४१ नागरिकांना दंड आकारून दिले मास्क

Share This News

नागपूर
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाच्या जवानांनी मंगळवारी (२९ डिसेंबर)ला मास्कशिवाय फिरणार्‍या बेजबाबदार १४१ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५00 प्रमाणे ७0 हजार ५00 रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कसुद्धा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोधपथकांनी २५ हजार ७८१ नागरिकांविरुद्ध कारवाई करून आतापर्यंत १ कोटी १२ लाख ४९ हजार ५00 रुपये इतका दंड वसूल केला.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा धोका अद्यापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक फिरताना दिसतात, ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोधपथकाद्वारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणार्‍या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे. तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे. मंगळवारी मनपा उपद्रव शोधपथकाद्वारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १९, धरमपेठ झोन अंतर्गत २६, हनुमाननगर झोन अंतर्गत १५, धंतोली झोन अंतर्गत ९, नेहरूनगर झोन अंतर्गत १५, गांधीबाग झोन अंतर्गत ८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १0, लकडगंज झोन अंतर्गत ९, आशीनगर झोन अंतर्गत १६, मंगळवारी झोन अंतर्गत ११ आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुद्ध ही कारवाई शोधपथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५00 रुपयांप्रमाणे आतापर्यंत २0,३११ बेजबाबदार नागरिकांकडून रु. १ कोटी १ लाख ५५ हजार ५00 वसूल करण्यात आले आहे.
नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणार्‍या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे आदिंची सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.