मनपाच्या २५ बसेस रुग्णवाहिकेप्रमाणे सेवा देणार

Share This News

नागपूर
कोरोनाचा प्रकोप वाढत असून, रुग्णालयात रुग्णांना जागा मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळून येत असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागते वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता महापालिकेने २५ बसेस रुग्णवाहिका म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात दररोज सात ते आठ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. यातील अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. वेळेवर एखाद्या बाधिताला दाखल करायचे असल्यास अशा गरजू रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याचे दिसून येते. तातडीच्या मदतीसाठी १0८ क्रमांवर रुग्णवाहिका उपलब्ध होते. अशा ११ रुग्णवाहिका आहेत, परंतु रुग्ण वाढल्याने या रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. शहरात निर्माण झालेली ही परिस्थिती लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. रुग्णवाहिकेप्रमाणे शहर बस उपलब्ध करून द्यायच्या असल्यास या बसमध्ये ऑक्सिजन व अन्य आवश्यक सुविधा निर्माण कराव्या लागतील. शिवाय बसमध्ये काही अंतर्गत बदलही करावे लागतील. त्यासाठी परिवहन विभागाने पूर्ण नियोजन केले आहे. सद्यस्थितीतील आकडेवारीनुसार शहरात ६५ हजारांहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हायचे असल्यास वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या दहा झोनला प्रत्येकी दोन बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. झोन स्तरावरील आरोग्य अधिकार्‍याकडे या बसेसचे नियंत्रण राहील. गृहविलगीकरणातील असणार्‍या बाधितांना कोविड केअर सेंटरवर पोहोचविणे, रुग्णालयात दाखल करणे, यासाठी या बसचा वापर केला जाईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑगस्ट महिन्यात सहा आपली बसचा रुग्णवाहिका म्हणून वापर करण्यात आला होता, हे विशेष. महापालिकेने अशाप्रकारे रुग्णसेवेसाठी बस उपलब्ध करून दिल्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.