चीन, आफ्रिकेतून बनावट कोरोना लस जप्त|Counterfeit corona vaccine seized from China, Africa

Share This News

जोहान्सबर्ग : जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे बनावट लसीचा धोकादेखील वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका गोदामातून कोरोना लसीच्या ४00 व्हायल्स (लसीची छोटी कुप्पी) जप्त केल्या आहेत. इंटरपोलने ही कारवाई केली आहे.

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, जप्त करण्यात आलेल्या व्हायल्सद्वारे २४00 डोस दिले जाऊ शकतात. जोहान्सबर्गपासून जवळ असलेल्या र्जमिस्टोन येथील एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात या बनावट लसी जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय बनावट मास्कही जप्त करण्यात आले आहेत. इंटरपोलने चीन, झांबियाचे नागरिकत्व असलेल्या तिघांना अटक केली आहे.
याआधी काही दिवसांपूर्वी चीनमध्ये पोलिसांनी बनावट लस पुरवठा करणारे रॅकेट उघडकीस आणले होते. या प्रकरणी ८0 हून अधिकजणांना अटक करण्यात आली होती. या टोळीकडून मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यांपासून बनावट लसींचा पुरवठा सुरू होता. पोलीस या बनावट लसींच्या मागावर होते. अखेर या टोळीपयर्ंत पोहचण्यास पोलिसांना यश आले.
इंटरपोलने या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑरेंज नोटीस जारी करून बनावट लसीचा धोका असल्याचा इशारा दिला होता. गुन्हेगारांच्या रॅकेटकडून कोविड लसीला लक्ष्य करण्यात येणार असल्याची शक्यता इंटरपोलने व्यक्त केली होती. कोरोना लसी संदर्भात दक्षिण आफ्रिका आणि चीनमध्ये आढळलेली प्रकरणे ही हिमनगाची टोक असण्याची शक्यता इंटरपोलने व्यक्त केली. दक्षिण आफ्रिका आणि चीनमध्ये बनावट लसीसंदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून काही महत्त्वाची माहिती हाती आली आहे. या बनावट लस प्रकरणाचे धागे काही खासगी नसिर्ंग होमशीही जोडले असल्याचे इंटरपोलच्या अधिकार्‍यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.