आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

Share This News

नागपूर : थकबाकीदार वीजग्राहकाचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केल्यानंतर तो अवैधपणे जोडणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, गड्डीगोदाम परिसरात राहणारे वीज ग्राहक मोहम्मद इब्राहीम मोहम्मद याकूब या वीजग्राहकाकडे १ लाख २९ हजार ९७० रुपयांची थकबाकी होती. पाठपुरावा करूनही मोहम्मद इब्राहीम मोहम्मद याकूब दाद देत नसल्याने महावितरणचे सहायक अभियंता रेवत येसांबरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह २५ मार्च रोजी थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला. वीज मीटर आणि सर्व्हिस वायरही जप्त केली. त्यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रविकांत वाघ, कविता सिंघल, प्रभात अग्रवाल, अलका पोपटकर यांनी थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा अवैधपणे जोडला. तसेच उपस्थित जनतेसमोर महावितरण विरोधात चिथावणीखोर भाषण केले. या घटनेची माहिती सहायक अभियंता रेवत येसांबरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, थकबाकीदार वीजग्राहकाने थेट वीजपुरवठा जोडल्याचे आढळून आले. महावितरणने पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला असता त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच वीजपुरवठा दबाव आणून सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी महावितरणकडून सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रविकांत वाघ, कविता सिंघल, प्रभात अग्रवाल, अलका पोपटकर यांच्या विरोधात भारतीय विद्युत कायदा कलम १३५, १३८. भादंवि कलम १८६, ३४नुसार गुन्हा दाखल केला.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर तो पुन्हा अवैधपणे जोडून दिल्या प्रकरणी महावितरणने सक्करदरा आणि नंदनवन पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर येथील ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्यावर तो पुन्हा जोडून दिल्या प्रकरणी सहायक अभियंता श्रीराम मुत्तेमवार यांनी दिलेल्या तक्रारी नंतर सक्करदरा पोलिसांनी वीजग्राहक राजेश तिवारीसह पीयूष आकरे, मनोज डफरे, संजय जीवतोड, अमोल मुळे, संजय अनासने, शुभम पारले, विकास नागराळे, अमोल गिरडे यांच्या विरोधात विद्युत कायदा कलम १३८नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत गाडगे बाबानगरातील सत्यफुलाबाई उराडे यांच्याकडे वीज देयकाची थकबाकी होती. महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यावर त्यांचा मुलगा राकेश उराडे याने आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून वीज पुरवठा अवैधपणे जोडून घेतला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.