भंडाऱ्यातील अग्निकांडात दोन नर्सेसविरोधात गुन्हा

Share This News

भंडारा : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीतकांडात दहा निष्पाप बाळांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन नर्सेसचा हलगर्जीपणा चौकशीत पुढे आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिली. याप्रकरणी शल्य चिकित्सकांसह सात जणांवर विभागीय चौकशीअंती कारवाई करण्यात आली आहे.
स्मिता संजय आंबिलढुके (वय ३४, रा. ग्रामसेवक कॉलनी, भंडारा) व शुभांगी यादवराव साठवणे (वय ३२, रा. सिव्हिल लाइन्स, भंडारा) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या अधिपरिचारिका पदावर कार्यरत आहेत. ९ जानेवारीच्या मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून १० बाळांचा कोळसा झाला होता. सात बालकांना वाचविण्यात यश आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीच्या अहवालाअंती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिता बडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना मेश्राम, डॉ. सुनील अंबादे, ज्योती बारस्कर आणि अधिपरिचारिका स्मिता आंबिलढुके व शुभांगी साठवणे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. साकोलीचे पोलिस उपअधीक्षक अरुण वायकर यांनी केलेल्या चौकशीअंती १९ फेब्रुवारीला स्मिता आंबिलढुके आणि शुभांगी साठवणे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास भंडाऱ्याचे पोलिस उपअधीक्षक संजय पाटील करीत आहेत.



Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.