पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केक खाण्यासाठी झुंबड
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही पवारांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
मात्र, हा कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी एक व्हिडिओ शेअर करत आयोजकांना टोला लगावला आहे.धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. पवारांच्या वाढदिवसासाठी ८१ किलोंचा केकही आणण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम संपताच केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. स्टेजवर केक खाण्यासाठी झालेली गर्दी पाहून आयोजकांनी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. निलेश राणे यांनी हाच धागा पकडत निशाणा साधला आहे.