बुलडाण्यात संचारबंदीचे आदेश
बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने व जिल्ह्यात सरासरी २०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी बुलडाण्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता बुलडाणा शहर व ग्रामीणच्या परिसरात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, आठवडी बाजारांवरही बंधने घालण्यात आली आहेत. संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी काढलेल्या लेखी आदेशात नमूद करण्यात आले आहे. शहर व ग्रामीण भागातील पानटपऱ्यांवरही बंधने घालण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज व शैक्षणिक संस्था २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश पुन्हा एकदा देण्यात आले आहेत. मास्क संदर्भातील कारवाईला वेग देण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याबाबत पोलिस विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. संचारबंदी आदेश मोडणाऱ्यांविरोधात तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.