चीनकडून सायबर हल्ल्याचा धोका- सीडीएस बिपीन रावत

Share This News

नवी दिल्ली, 08 एप्रिल : बदलती रणनिती आणि परिस्थिती पाहता भविष्यात चीन कडून भारतावर सायबर हल्ल्याचा धोका संभवत असल्याचा इशारा ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) बिपीन रावत यांनी दिला. विवेकानंद चरनेशनल फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान सायबर डोमेनला अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने भारत काम करीत असल्याचे रावत यांनी सांगितले. यावेळी सीडीएस रावत म्हणाले की, चीनमध्ये एवढी क्षमता आहे की ते भारतावर सायबर हल्ला करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात आपल्या सिस्टिम्सना नुकसान पोहोचवू शकतात. भारत अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सायबर डिफेन्स सिस्टिमवर काम करत आहे. भारतातील सायबर संस्था सायबर हल्ल्याविरोधात फायरवॉल्स बनवत आहेत जेणेकरून आपण हा हल्ल्यांना त्वरित प्रत्युत्तर देऊ शकू आणि या हल्ल्यांचा परिणाम दीर्घकालीन राहणार नाही. तिन्ही सैन्य दलांच्या एकीकरणातून या हल्ल्यापासून वाचता येईल. काही पाश्चिमात्य देशांचे भारताशी असणारे संबंध अशाप्रकारे हल्ले रोखण्यात मदतीचे ठरू शकत असल्याचे रावत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि क्वांटम कंप्यूटिंगबाबत बोलताना रावत यांनी सांगितले की, याचा उपयोग भविष्यातील देखभाल आणि नौदल अंडरवॉटर डोमेनसाठी केला जात आहे, परंतु या क्षेत्रात आपण चीनपेक्षा मागे पडलो आहोत. क्वांटम कंप्यूटिंगमध्ये भारताची प्रगती समाधानकारक नाही. मात्र आता याची सुरुवात झाल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.