कऱ्हांडल्यात पाच बछड्यांसह ‘फेअरी’चे दर्शन
नागपूरच्या उमरेड -कऱ्हांडला अभयारण्यात एक वाघीण तिच्या पाच बछड्यांसह मुक्त संचार करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बुधवारी सकाळी अभयारण्यात आलेल्या पर्यटकांना एक वाघीण तिच्या पाच बछड्यांसह दिसल्यावर अनेकांनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. एकाच वेळी वाघिणीसह पाच बछडे दिसण्याची घटना दुर्मिळ मानल्या जात आहे.
सर्वात रुबाबदार वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जय’ वाघाच्या वास्तव्याने उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य प्रसिद्धी झोतात आले होते. परंतु जय च्या अचानक बेपत्ता झाल्याने येथील पर्यटक संख्या रोडावली होती. त्यातच मागील वर्षी कोरोना मुळे लॉक डाऊन लागल्याने अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. आता अभयारण्ये पर्यटकांसाठी उघडण्यात आल्यावर बुधवारी पहिल्यांदा एका वाघिणीने तब्बल पाच बछड्यांसह दर्शन दिले. ‘फेअरी’ किंवा टी-६ असे या वाघिणीचे नाव आहे. अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेश द्वारावरून प्रवेश केलेल्या पर्यटकांना बुधवारी सकाळी हि वाघीण व तिचे बछडे दिसले. फेरी ने बछड्यांसह रास्ता पार केला आणि परत माघारी येताना मागे पडलेले दोन बछडे एकामागोमाग एक तोंडात पकडून नेले. जयच्या मृत्यूमुळे मागील काही दिवसात या अभयारण्याची लोकप्रियता घसरली होती.तीन बछड्यांसह एका वाघिणीची शिकारही झाली होती. या पार्श्वभूमीवर नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे पर्यटकांची पावले पुन्हा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याकडे वळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते एखादी वाघीण साधारणतः तीन ते चार बछड्यांना जन्म देते. पाच किंवा त्यापेक्षा अधिक बछड्यांना जन्म देण्याची घटना क्वचितच घडत असते. सुमारे एक महिना वयाची हि बछडे असून या बछड्यांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी आता वनविभागवर आहे.