ज्येष्ठ क्रीडा संघटक अरुण गडकरी यांचे देहावसान

Share This News

नागपूर: महाराष्ट्रातील प्रख्यात क्रीडा मंडळ नागपूर शारीरिक शिक्षण मंडळाचे सचिव, महाराष्ट्र आट्यापाट्या महामंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी, नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे माजी असिस्टंट डायरेक्टर, क्रीडापटू व क्रीडा संघटनांचे लोकप्रिय जेष्ट क्रीडा संघटक प्राध्यापक अरविंद उर्फ अरुण दिवाकरराव गडकरी सर यांचे आज ( शनिवारी) 81 व्या वर्षी देहावसान झाले.
त्यांच्यापश्चात पत्नी लेखिका प्रा. उषा गडकरी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.1973 मध्ये गडकरी यांनी नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण व रंजन मंडळात सहसंचालक पदाची सूत्रे हाती घेतली होती. 1965 पर्यंत त्यांनी नागपूर शारिरिक शिक्षण महाविद्यालयात लेक्चरर पद संभाळले. 1965 ते 73 पर्यंत त्यांनी वायुसेना नगरातील केंद्रीय विद्यालयात पीईटी म्हणून लोकप्रियता मिळविली. याच काळात त्यांनी नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालया लेक्चरर पदावर कार्य केले होते.
अमरावती विद्यापीठ नसताना नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे सहसंचालकपद सांभाळताना त्यांनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ हँडबॉल, बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. 1973 मध्ये आंतरविद्यापीठ लॉन टेनिस स्पर्धा झाली, त्या स्पर्धेत भारताचा विख्यात टेनिसपटू विजय अमृतराज खेळला होता व त्याने सुंदर आयोजनाबद्दल गडकरींचे आभार मानले होते. अरुणा गडकरींच्या कार्यकाळातील ती पहिलीच स्पर्धा होती. 27 वर्षे सहसंचालकपद हाताळतांना आंतर विद्यापीठ टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन (प्रत्येकी दोन वेळा), बुद्धिबळ, हॉकी, फुटबॉल, कुस्ती, महिला क्रिकेट, पुरुष कबड्डी,खो-खो, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण, क्रॉस कंट्री यासह अन्य क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन त्यांच्या मार्गदर्शनात झाले होते. ॲथलेटिक्सची आंतर विद्यापीठ स्पर्धा विद्यापीठाच्या ट्रॅकवर व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यात त्यांना यश मिळू शकले नाही ही खंत ते खासगीत व्यक्त करायचे. त्यांनी संपूर्ण विदर्भातील आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते.


महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. चाळीसच्यावर एमपीएडच्या विद्यार्थ्यांना त्यांनी लघुशोध प्रबंधासाठी मार्गदर्शन केले होते. वर्तमानपत्रातून त्यांनी अनेक लिखाण केले. नॅशनल असोसिएशन ऑफ फिजिकल एज्युकेशन अंण्ड रिक्रिएशन ऑफ इंडिया फांर इंडियन गेम्सच्या शिक्षक पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.
1989 मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या क्रीडा विषयक सेमिनारमध्ये त्यांनी भाग घेतला होता. रोल ऑफ फिजिकल एज्युकेशन अंड स्पोर्टस डेव्हलपमेंट ऑफ ह्यूमन रिसोर्सेस या विषयावर पेपर सादर करून लक्ष वेधून घेणारे अरुण गडकरी यांचा क्रीडा संस्था- संघटना, बालजगत, विवेकानंद केंद्र व क्रीडा मंडळ या संस्थेशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. श्री शिवछत्रपती पुरस्काराचे ते प्रबळ दावेदार असायचे पण शासनदरबारी मी अर्ज सादर करणार नाही यावर ते अखेरच्या श्वासापर्यंत ठाम राहिले. सर्वांना हवेहवेसे क्रीडा संघटक अरुण गडकरी यांच्या निधनाने क्रीडा व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.