राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबवण्याचा निर्णय घेतलाय; बाळासाहेब थोरात यांचं मोठं विधान | Decided to stop elections of co-operative societies in the state; Balasaheb Thorat’s big statement

Share This News

 मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनाचं संकट येतंय असं वाटत असेल तर येणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकला. एक वर्षाने या निवडणुका घ्या, असं म्हटलं होतं. त्याबाबत थोरात यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ही मोठी माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या फेजमध्ये आघाडी सरकारने उत्तम काम केलं आहे. आता कोरोनाची दुसरी फेज आली आहे. याला कारण वाढणारी गर्दी आहे. त्यामुळे सण, उत्सव आणि लग्न समारंभांवर आपण निर्बंध घालत आहे हे खरं आहे, असं सांगतानाच सहकारातील निवडणुकाही थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही कुठे कमी पडतोय असं वाटत नाही, असं थोरात यांनी स्पष्ट केलं.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसल्याने त्यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. नेमकं यात आपण कुठं कमी पडतोय हे तज्ज्ञ मंडळींना विचारण्याची गरज आहे, असं सांगतनाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही? असा सवालही त्यांनी केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात भाषा कमी पडत नाही तर आपणच कमी पडत आहोत. मराठी भाषेचं महत्त्व कधीही कमी होऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आमदारांच्याही टेस्ट होणार

अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. त्यावरून त्यांनी विरोधकांनाच सुनावले. आज राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता आमदारांच्या टेस्ट केल्या जातील. यात किती आमदार बाधित असतील हे अद्याप माहीत नाही. अशा परिस्थितीत अधिवेशनाचा कालावधी अधिक असणं योग्य नाही. एकीकडे निर्बंध घालायचे आणि दुसरीकडे गर्दी करायची हे योग्य नाही. विरोधक केवळ विरोधाला विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

तेव्हा आंदोलन करणारे आता कुठे गेले?

कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. त्यामुळे व्यक्ती, कुटुंबाचं उत्पन्न जसं घटलं, तसंच राज्याचंही झालं आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात खर्च करताना प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. उत्पन्न कसं वाढेल याचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे, असं सांगतनाच पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येईल. मात्र, यात खरी जबाबदारी ही केंद्राचीच आहे. सरकार चर्चा करेलच, पण केंद्रानेही आपली जबाबदारी पार पाडावी. पेट्रोल-डिझेलचे भाव 50 रुपयांचे 55 रुपये झाले तेव्हा आंदोलन करणारे आता कुठे गेले होते? असा सवालही त्यांनी केला.

राठोड यांना पाठिशी घालण्याचा प्रश्नच नाही

यावेळी त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. राठोड यांना पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. चुकीला चूक म्हणण्याची आघाडी सरकारची भूमिका आहे. या प्रकरणाचा योग्य तपास केला जाईल, असंही ते म्हणाले.

30 हजार 820 सहकारी संस्थांच्या निवडणुका बाकी

राज्यात एकूण 45 हजार 276 सहकारी संस्थांची निवडणूक बाकी आहे. त्यापैकी क आणि ड वर्गातील 30 हजार 820 सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्राधिकरणाची तयारी सुरू केलेली आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 17 मार्चला पुन्हा 3 महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला. पुढे अजून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता राज्य सरकारने पुन्हा या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.