दिपालीनेआत्महत्या करायला नको होती , बोलायला काय जात ?

Share This News

चार दिवसांपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसालच्या वनपरिक्षेत्र दीपाली चव्हाण तीन सुसाईड नोट लिहून ठेवून नाईलाजास्तव त्या मृत्यूला सामोऱ्या गेल्यात. त्यापूर्वी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्या त्यांचे वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांच्याशी बोलल्या होत्या. एक वर्षांपूर्वी त्या अमरावतीच्या खासदार श्रीमती नवनीत राणा यांच्याशीही बोलल्या होत्या. अर्थातच त्यांच्या काही सहकाऱ्यांनाही त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती असणारच . आत्महत्येपूर्वी त्यांनी एक पत्र रेड्डीना ,दुसरे आपल्या पतीला आणि तिसरे आपल्या आईला लिहिले आहे. तिचे वरिष्ठ अधिकारी शिवकुमार तिला किती त्रास देत होते, हे तिने नवऱ्याला लिहिलेल्या पत्रात उदधृत केले आहे. शिवकुमारने तिला अक्षरशः वेडे करून सोडले होते. तिच्या सहनशक्तीचा अंत झाल्यावर आणि तिच्याजवळ दुसरा कोणताही मार्ग उरला नाही, त्याचवेळी तिने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे, याचीही दखल फेसबुकवर गळा काढून ओरडणाऱ्यांनी घ्यावी. ती एक बेधडक काम करणारी, विचारपूर्वक, कर्तव्यदक्ष कर्मचारी, प्रेमळ पत्नी, कर्तव्याची जाण असलेली मुलगी होती. माझ्या मृत्यूनंतर मिळालेल्या पैशातून घराचे हप्ते भर, असे ती आपल्या आईला मरताना पत्रातून सांगते,आपल्या कामात ती कोणताही कसूर ठेवत नव्हती. आईचे औषध आणायला सुद्धा तिच्याजवळ कार्यालयीन कामामुळे वेळ रहात नसे, असेही तिने लिहिले आहे.मग शिवकुमारला तिच्यामुळे काय त्रास होता? ते तिला का त्रास देत होते, रेड्डीजवळ दिपालीने तक्रार करूनही तिला रेड्डींनी का मदत केली नाही, रेड्डीनी शिवकुमारला पाठीशी का घातले? कळस म्हणजे नवनीत बाईंनी दीपालीला एक वर्षांपासून मदत का केली नाही? एका बाईची तक्रार नवनीतबाईंच्या हृदयापर्यंत का गेली नाही? दीपाली प्रेग्नन्ट असताना तिला दगडधोंड्याच्या कच्च्या , बारीक गिट्टी टाकली असलेल्या रस्त्यावरून ६-७ किलोमीटर का चालायला लावले, तिला ट्रेकिंग का करायला लावले? तिचे ऍबॉर्शन झाले असतानाही तिला का पायपीट करायला लावली

? दिपालीसारख्या सामान्य कर्मचाऱ्याचा इतका राग राग करण्याचे शिवकुमारला कारण काय? आणि शिवकुमारला पाठीशी घालण्याची तसदी रेड्डी का घेत होते? बाकीच्या महिला कर्मचारी वेळीच दिपालीच्या पाठीशी का उभ्या राहू शकल्या नाहीत? प्रश्नच प्रश्न आहेत.


सोशल मीडियावर जेव्हापासून ही बातमी आणि तिने लिहिलेली पत्रे झळकलीत, तेव्हापासून आपापली मते देण्याची अहमहमिका चालू आहे. बहुतांशी सूर असा आहे की, तिने आत्महत्या करायला नको होती, आधीच तक्रार करायला हवी होती, आमच्यासारख्यांना सांगितले असते, तर आम्ही मदत नसती का केली, आता इतक्या मोठ्या संख्येने लोक बोलू लागले आहेत, तर तिच्या जिवंतपणीही पाठीशी राहिले असते, आत्महत्या हा मार्ग नव्हे, मरायचेच होते तर त्याला मारून, त्याला धडा शिकवून मरायला हवे होते. बरोबर आहे.तिने आत्महत्या करायला नकोच होती. पण तिने ती केली, याचा अर्थ ती किती मजबूर असेल? तिचा किती छळ झाला असेल? करायला नको होती, असे म्हणतात आपण चौफेर विचार करू या ना. नाहीतर याला मी बसल्या जागेवर तोंडाची वाफ दवडणे म्हणते. माणूस गेल्यावर सगळेच बोलतात, सगळेच मदतीची तयारी दर्शवतात. तिने सुट्टीवर जायला हवे होते म्हणे. ती सुट्टी मंजूर कोण करणार? शिवकुमारने सुट्टी मंजूर केली असती? ऍबॉर्शन झालेल्या बाईला तो कच्च्या रस्त्याने ८ किलोमीटर चालायला लावतो, ट्रेकिंग करायला लावतो; तो तिला सुट्टी देणार होता? घाणेरड्या भाषेत तो तिचा अपमान करायचा, तुझ्यावर अट्रोसिटी लावायला पोलिसांना सांगतो अशी धमकी द्यायचा, तू तू करून अतिशय माजोराड्या भाषेत बोलायचा; तो तिला सुट्टी मंजूर करणार? रेड्डीने तिला मदत केली नाही, राणा ने तिला मदत केली नाही. तुम्ही आम्ही कोण? कशी मागणार ती तुम्हा आम्हाला मदत? सोशल मीडियावरून? आणि आपला जीव धोक्यात घालून तुम्ही जाणार तिला मदत करायला? अहो, कोरोना आहे म्हणून साधा वर्षभरात प्रवास न करणारे तुम्ही आम्ही आणि शिवकुमारच्या विरोधात उभे राहिला असता? तिच्याच सहकारी आता तो साहेब किती चांगला आहे, दिपालीचेच कसे चुकत होते, हे सांगत फिरत आहेत.स्त्रीला सल्ला देणं सोपं आहे. जिच्यावर बितते ना, तिलाच कळतं. तक्रार करायला गेलेल्या स्त्रियांना पोलीस, पोलीस स्टेशनमध्ये रात्रीचे१० काय नि १२ वाजेपर्यंत काय, बसवून ठेवतात, तिलाच सांगतात, जरा सबुरीने घे बाई, जरा सहन कर बाई. कार्यालयांमध्ये वरिष्ठ सर्रास स्त्रियांची मुस्कटदाबी करतात, किती जणी तिच्या मदतीला जातात? पोलीस तक्रार घेत नाहीत, अनेकदा विरोधी पार्टी तिला साधा वकील मिळू देत नाहीत, मिळाला तरी त्याला बिचकवतात, तिची कोंडी कोंडी करतात. घुसमट होते तिची.मृत्यूला सामोरे जाणे सोपी गोष्ट नाहीच, भित्रेपणा तर नाहीच नाही, पण एखादी व्यक्ती जेव्हा हा मार्ग अवलंबते तेव्हा त्यापेक्षा तिचे जगणे किती कठीण झालेले असेल याचा विचार करा. काही स्त्रिया यातून मार्ग काढतात, कधी योग्य पद्धतीने, कधी परिस्थितीशी समझोता करून. काही फसतात, काही नोकरी सोडतात, तर काही आत्महत्या करतात; सुसाईड नोट न लिहिता. पण दिपालीने नोट लिहून ठेवली आहे. हे सर्वात मोठे सबूत आहे. याउप्पर आणखी कोणते सबूत हवे आहे पोलिसांना? शिवकुमार, रेड्डी आणि खासदार नवनीत राणा हे तिघेही या मृत्यूला, नव्हे खुनाला कारणीभूत आहेत. या तिघांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी. अधिकाऱ्यांचे निलंबन ही शिक्षा नव्हे,ही दिपालीच्या मृत्यूची मस्करी आहे. त्यांच्यावर खुनाचाच आरोप असावा आणि नवनीत रानांनी ताबडतोब राजीनामा द्यावा.
लवकरच आम्ही अमरावतीच्या पोलीस कमिश्नर कार्यालयासमोर धरणे द्यायला बसणार आहोत, सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या मित्रमैत्रिणींची मला नक्कीच साथ मिळेल, अशी आशा आहे. जे माझ्यासोबत आहेत, त्यांनी नक्की मला ९९७००९५५६२ यावर संपर्क करावा.

अरुणा सबाने

अध्यक्ष माहेर संस्था, नागपूर.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.