बर्ड फ्लूमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क; सातारा जिल्ह्यात 97 कोंबड्या, 6 कावळ्यांचा मृत्यू

Share This News

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसात 97 कोंबड्या, 1 बगळा आणि 6 कावळ्यांचा मृत्यू झाला असून तडवळे (ता. कोरेगाव) येथील मृत बगळ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, अन्य अहवाल प्रलंबित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून फैलाव रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.

जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात सर्वेक्षण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांच्या कालावधीत खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी कापरेवस्ती व शिंदेवस्ती येथे सुमारे 87 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असल्याचे आढळून आले. कराड तालुक्यातील हणबरवाडी येथे 10 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. सुमारे 97 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. लोणंद येथील 4 कावळे, भिलार (ता. महाबळेश्वर) येथील 1 कावळा, मलवडी (ता. माण) येथील 1 कावळा तसेच हणबरवाडी येथील 2 कोंबड्या व मरिआईचीवाडी येथील 8 गावठी कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी औंध (पुणे) येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.

खटाव तालुक्यातील तडवळे येथे एका बगळ्याचा मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर कोंबड्यांचे नमुने अधिक तपासणीसाठी भोपाळ येथील केंद्रीय रोग अन्वेषण विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कावळे व कोंबड्यांचा कोणत्या आजाराने मृत्यू झाला हे स्पष्ट होणार आहे. सातारा जिल्ह्यात 49 जलद प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात पोल्ट्री फार्मची संख्या 204 असून यामध्ये 8 लाख 55 हजार 302 पक्षी आहेत. तर चिकन फार्मची संख्या 1 हजार 114 असून त्यामध्ये 37 लाख 46 हजार 742 पक्षांची संख्या आहे. देशी फार्मची संख्या 31 असून त्यामध्ये 34 हजार 631 देशी पक्षी आहेत. पक्षी नसलेल्या फार्मची संख्या 161 आहे. असे मिळून जिल्ह्यात 1 हजार 510 पोल्ट्री फॉर्मस आहेत. यामध्ये 46 लाख 36 हजार 675 पक्षी आहेत. जिल्ह्यात बदकाचे फार्म एक असून यामध्ये 30 बदके आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.