उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार Deputy Chief Minister Ajit Pawar felicitates women police officers

Share This News

पुणे, दि. 13 : पोलीस दलात काम करताना अचानक उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना न डगमगता करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी असेच चांगले काम करुन पोलीस विभागाचे नाव उज्ज्वल करावे, अशी आशा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

माहेर महिला प्रतिष्ठानच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माहेर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे उपस्थित होत्या.

महिला दिनाच्या औचित्त्याने हा सत्कार आपण करत आहोत. परंतू 12 मार्च या दिवसालाही महत्त्व आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. श्री.पवार यांनी प्रारंभी स्व.यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन केले व ते पुढे म्हणाले, स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या विचारावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय. त्याबाबतचा दृढ संकल्प केला आहे. प्रगत, संपन्न, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचे काम स्व.चव्हाण यांनी केले असे सांगून स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव त्यांनी केला.

पोलीस खात्यासमोर अचानक समस्या उभ्या राहतात. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत पोलीस विभागाची विशेष जबाबदारी आहे. कोरोना वाढतोय त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे सांगून सर्व घटकाला, नागरिकांना लसीकरण कसे करता येईल याचे नियोजन करत असल्याबाबत त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी जाहीर केलेल्या सवलती, योजनांबाबत माहिती देऊन कोरोनासारख्या अडचणीच्या काळातही अर्थसंकल्पामध्ये चांगले निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

एमपीएससीच्या परीक्षा देऊन विद्यार्थी पोलीस, महसूल यासारख्या विविध विभागात काम करतील. काही दिवसातच परीक्षा घेतली जाईल असे सांगितले होते, त्यानुसार परीक्षेच्या तारखाही आता जाहीर झाल्या आहेत. परीक्षेबाबत झालेल्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, अभ्यासावर लक्ष द्यावे, स्वत:ची काळजी घ्यावी, यश संपादन करावे, जे क्षेत्र निवडतील त्यात मनापासून उत्तम काम करावे, असा सल्लाही एमपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.

पोलीस उपायुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, पुणे शहरामध्ये महिला पोलिसांचे प्रमाण जास्त आहे. महत्त्वाच्या पदावर महिला आहेत. सर्व महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करुन सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, स्वप्ना गोरे, पोर्णिमा गायकवाड, भाग्यश्री नवटके, प्रियंका नारनवरे, मधुरा कोराणे यांचा उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते साडी, श्रीफळ, सन्मानपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील पोरे यांनी केले. प्रास्ताविकात अध्यक्षा विद्या म्हात्रे यांनी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमास माहेर प्रतिष्ठानच्या मीना नाईक, सीमा रामनंद, निकीता लोकरे, अमृता शहा उपस्थित होत्या.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.