उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन, खत प्रकल्प बनला गर्दुल्यांचा अड्डा

Share This News

आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आणि फळ मार्केटमधून जवळपास 60 टन ओला आणि सुखा कचरा निघतो. हा कचरा एपीएमसी गोळा करून महापालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर टाकते. या जमा केलेल्या कचऱ्यातून खत निर्मिंती करण्यासाठी एपीएमसीने सिडकोकडून भूखंड घेतला होता .

या भूखंडाचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क आणि ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, एपीएमसी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रकल्पाला शासनातर्फे 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. दहा वर्ष उलटून गेले तरी प्रकल्प कागदावरच राहील्याने या परिसराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे.

भाजीपाला मार्केट गेटनंबर सातच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर वीस वर्षांपूर्वी तुर्भे रेल्वे समोरील सेक्टर 20 मधील नागरिकांच्या मुलांसाठी अंगणवाडी चालवण्यात येत होती. पण मार्केटमधील व्यापारी आणि कर्मचारी यांची वर्दळ वाढल्याने ही अंगणवाडी बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्या येथे तळीराम, गर्दुल्ले आणि जुगारी यांनी आपला अड्डा केला आहे. शिवाय गांजा आणि नशिल्या पदार्थांचे सेवन केले जाते.

चोरून आणलेल्या वस्तू येथे लपवून ठेवल्या जात असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या ठिकाणी अनेकदा स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. पण अनेकदा कारवाई करूनही या घटना थांबत नसल्याने पोलिसांनी एपीएमसी प्रशासनाला जागा वापरात आणण्याची सूचना केली. त्यावर खत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्यात येते. सुरक्षा रक्षक नसल्याने अंधाराचा फायदा घेत दारुड्यांची येथे मैफिल जमते. रिकाम्या बाटल्या येथेच फेकल्या गेल्याने कांचांचा खच पडलेला दिसून येतो. याकडे एपीएमसी प्रशासनची लक्ष देत नसल्याने या समाजकंटकांचा रात्री उशिरापर्यंत गोंधळ चालू असतो. त्यामुळे भाजीपाला बाजारात येणाऱ्या व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

या भागात एमटीएनएल आणि बाजार समितीत काम करणाऱ्या महिला कर्मचारी, व्यापारी आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. परिसरातील अनेक गोदामे आणि दुकानांमध्ये या लोकांकडून चोऱ्या देखील केल्या जातात. येथे जाणाऱ्या सुरक्षा रक्षकांना शिविगाळ करण्यात येते. त्यामुळे परिसरात दिवाबत्ती करण्यात यावी आणि या जागेवर लवकरच प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

या ठिकणी परप्रांतीय बांगलादेशी घुसखोरी करून राहतात. बाजार समिती प्रशासन किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांचे कोणतेही लक्ष नाही. बांगलादेशींनी मोठा उच्छाद मांडला असून भविष्यात या ठिकाणी हैदराबाद सारखी गंभीर घटना घडू नये म्हणून प्रसिद्धी माध्यमांनी हा प्रकार उघडकीस आणावा, अशी इच्छा समाजसेवक दिपक जाधव यांनी व्यक्त केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.