अनिल देशमुखांनी पवार यांना धमकी दिली की काय?

Share This News

माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली शंका, बुधवारी राज्यपालांना शिष्टमंडळ भेटणार

मुंबईः ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सन्मानाचे धिंडवडे निघाले आहेत. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी  मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी मागणी  भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या मागणीसाठी भाजपाचे शिष्टमंडळ बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार आहे. पोलीस महासंचालक दर्जाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली किंवा सीबीआयमार्फत  चौकशी होणे अत्यावश्यक आहे. परमबीर सिंग यांनी यापूर्वीच वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील प्रमुख मंडळींना या सर्व प्रकरणा संदर्भात माहिती दिल्याचे पत्रात नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत शासनाकडून खुलासा प्रसिद्ध कारण्याची  तसदीही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. सिंग यांनी तक्रार केलेल्या संबंधित मंत्र्यावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत, असे दिसते. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून या घटनांबाबत अहवाल मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींना पाठवावा, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली. 
गृहमंत्री देशमुख हे १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत क्वारंटाईन होते, असा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा खुलासा धादांत असत्य आहे, हे दाखवून दिले आहे. आता तरी राष्ट्रवादीने गृहमंत्री देशमुख यांना निर्दोष ठरविण्याची घाई करू नये, असेही त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगणारे शरद पवार आता राजीनाम्याची गरजच नसल्याचे सांगत आहेत. त्यांना गृहमंत्री देशमुख यांनी धमकी दिली की काय, अशी शंका मुनगंटीवार यांनी उपस्थित केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.