नामोपासकासाठी अन्न सेवनाचे तारतम्य

Share This News

अद्यते अस्मै इति = ज्याला खाल्ले जाते ते अन्न. अन्नाचे गुणधर्मानुसार सात्विक, राजसी व तामसी अशा तीन प्रकार मानले आहेत.

सात्विक अन्न — रसयुक्त, सौम्य, स्निग्ध, स्थिर, ताजे व हृदयाला हितकारक असते या अन्नाच्या सेवनाने आयुष्य बळ, सत्वगुण, आरोग्य व सुख लाभते.

राजसी अन्न — कडू, अति तिखट, अति खारट, रूक्ष, मसालेदार, आंबट, आंबवलेले असे मानले आहे या राजसी अन्नाच्या सेवनाने खाणार्‌याला व्याधी, रोग, दुःख, जरा (म्हणजे म्हातारपण लवकर येणे) मानसिक उद्वेग, चंचलता इत्यादी गोष्टी होतात.

तामसी अन्न — शिळे, उष्टे, बेचव, अपवित्र, सडलेले, अस्वच्छ, आणी मांसाहार असे तामसी अन्न होय. याने बुद्धीला मलीनता येते, मतीभ्रष्ट होते, विवेक हीनता येते, असाध्य रोगांची भरमार, आणी स्वभावात क्रुरता येते.

सद्य परिस्थितीत याचे काटेकोर पालन करणे कठीण झाले आहे तरी तारतम्य ठेवून सात्विक आहारावर भर द्यावा. आपल्या आहारात षड्‌रस असावेत असे आहार शास्त्र सांगते. अन्नाचे गुणदोष पहाताना अति नको व वर्ज्य ही नको. सर्व प्रकारचा आहार कमी अधीक प्रमाणात शरीराला आवश्यक असतो व तो घेतला पाहिजे. नामात प्रगती व्हावी असे वाटत असल्यास कमी गोड, कमी तिखट, कमी मीठ असा सौम्य आहार घ्यावा. चमचमीत खाण्याची अगदीच इच्छा असल्यास आठवडयातून एक दिवस खावे. जेवताना वा काही खात असताना स्वस्थ चित्ताने खावे. टी.व्ही पहात, बडबड करीत, हातात डिश घेऊन इकडे तिकडे फिरत, टेलीफोनवर बोलत, आडवे तिडवे बसून खाऊ नये. जुन्या सवयी एकदम जाणार नाहीत पण सुधार करण्याचे भान ठेवावे. हरि चिंतने अन्न सेवित जावे। हे लक्षात ठेवावे.
जे अन्न ताजे आहे, गरम आहे, घरच्या लोकांनी सद्‌भावाने तयार केलेले आहे, देवाला समर्पित केलेले आहे, कष्टाच्या कमाईतून तयार झालेले, स्वच्छता, पावियिं, संभाळून तयार केलेले, अतिथी देवो भव ही भावना ज्या घरात नित्य आहे तेथील, मंदिर मठ आश्रमातील नैवेद्य, भंडारा, लंगर, साधकांच्या हातचे अन्न, व्रत वैकल्याचे अन्न, कूलधर्म कूलाचाराचे अन्न, विशेष पर्व प्रसंगी बनलेले अन्न, भिक्षा मागून आणलेले अन्न, मधुकरी हे अन्न नामसाधकाला सेवनीय आहे. हे सात्विक अन्न म्हणण्यास हरकत नाही. अशा अन्नाने नाम साधनेत काही कमी येणार नाही. नित्य उपासनेत सुद्धा याने बाधा येणार नाही. आपल्या प्रकृतीला मानवेल, रूचेल, पचेल ते खावे. हितभुक्‌।मितभूक्‌। हितकारक व मित प्रमाणात खावे. चायनीज, थाई, युरोपिअन रेसीपीज नाविन्य म्हणून क्वचित वेळी स्वीकार्य आहे पण त्याचा आपल्या मुख्य अन्नात समावेश करू नये. या प्रकारच्या फास्ट फूड कल्चरने आपल्या समाजात नवीन व्याधींची भर पडलेली आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. (वाढत्या वयात तोंडाला लगाम लावावा)

तीन प्रकारचे अन्नदोष व त्याचे निराकरण —

(१)द्रव्य दोष — सन्मार्गाने, कष्टाने, न्यायोचित मार्गाने मिळवलेल्या पैशातून जे अन्न येते ते शुद्ध अन्न होय. भ्रष्टाचार लुबाडणूक, रिश्वत, काळाबाजारी, दमबाजी, गुंडा गर्दी, सरकारी कर चुकवणारे अशांच्या उत्पन्नातून येणारे अन्न दोषपूर्ण असते. या अन्नाची शुद्धी होणे कठीण असते म्हणून नामसाधकाने असे अन्न टाळावे. अन्नाच्या सूक्ष्म भागाने मन बनते त्यामुळे अशा अन्नाने खाणार्‌याचे मन अशांत, अस्थीर बनते, बेचैनी राहते, मनात नको ते विचार येतात, उपासनेत मन लागत नाही तेव्हा हे शक्यतो टाळावे. राजकीय व सरकारी संबंधीतांच्याकडेचे जेवणाचे आमंत्रण नामोपासकाने विचार पूर्वक स्वीकारावे. खरे तर स्वीकारू नये. आपली पुण्याई, नामसाधना अबाधित रहावी हाच या मागचा विचार असतो. नामोपासकाने या बाबतीत इतरांचा विचार करू नये आपला स्वतःचा करावा.

(२)दृष्टी दोष — माणसाच्या इच्छा, वासना डोळयातून प्रगट होतात असे म्हणतात व ते खरेच आहे. एखाद्याची नजर चांगली का वाईट हे अनुभवी व्यक्तीला लगेच कळते. विशेषतः स्त्रीयांना याची अधीक जाण असते. बाजारातून कितीतरी अत्यावश्यक गोष्टी आपण विकत घेतो त्या अगोदर असंख्य लोकांची नजर त्यावर पडलेली असते, किती तरी गोरगरीबांना ते विकत घेणे शक्य नसते, त्यांच्या अतृप्त इच्छा, वासना दृष्टीरूपाने त्यावर अडकलेल्या असतात, असे धान्य, फळे, भाज्या, अन्न पदार्थ यावर या वासनांचा सूक्ष्मरूपाने प्रभाव असतो. हा प्रभाव दोष काढण्यासाठी प्रथम देवाला नेवैद्य दाखवून मग ते ग्रहण करावे असे हिंदुधर्म शास्त्र सांगते. भावनेने देवाला प्रथम अर्पण केले की भावनेच्या प्रभावाने हा दोष जातो व अन्न शुद्धी होते. अगदी चहा कॉफी, नाश्ता वगैरे ही भावनेने देवाला अर्पण करावे व मग स्वीकारावे. प्रत्येक वेळी देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला पाहिजे असे नाही. दुपारचे जेवण मात्र देवासमोर नैवेद्य दाखवूनच घ्यावे. कांही ही खाताना, पिताना प्रथम श्रीराम म्हणून मग ते घ्यावे. रस्त्यावरचे हातगाडी वरचे, स्टॉलवरचे, उघडयावरील लग्न समारंभाचे बुफे वगैरे कार्यक्रमातील अन्न पदार्थ यांची स्वच्छता पाहिजे तशी पाळली जात नाही शिवाय सूक्ष्म वायुरूपात असणार्‌या दुष्ट शक्ती, भूत, प्रेत, पिशाच्च इत्यादी अतृप्त शक्तींची संस्कारित अन्नावर दृष्टी पडते व दृष्टीनेच त्यांची तृप्ती होते, अशा शक्ती कुठे नाहीत, सर्वत्र आहेत आपल्याला फक्त स्पष्ट पणे दिसत नाहीत इतकेच. म्हणूनच उघडयावर बसून वा रस्त्याने जाता येता, निर्जन ठिकाणी, झाडाखाली वा निर्जन घरात अन्न सेवन करू नये सांगितले जाते. संस्कारित अन्नाच्या सुगंधाने या अदृश्य शक्ती लगेच खेचल्या जातात व अन्नावरील केवळ त्यांच्या नजरेने ही अन्न दुषित होते. ही वस्तुस्थिती अनेकांनी अनुभवलेली आहे. याबद्दल अनेक सत्यकथा प्रसिद्ध आहेत. स्वतःचे कल्याण इच्छिणार्‌याने यात तर्क—वितर्क न काढता बोध घ्यावा. रसास्वाद घेताना थोडा विवेक ठेवला तर त्यात स्वतःचेचे हित आहे.

(३)स्पर्श दोष — अन्न बनविणर्‌या व्यक्तीचे त्या वेळचे जे मानसिक चिंतन असेल ते स्पंदन रूपाने त्या अन्नात उतरते. ही स्पंदने हाताचा तळवा व बोटांची अग्रे यातून बाहेर पडतात. स्वयंपाकाच्या वेळी रागवारागवी, चिडाचिड, संताप, द्वेष वगैरे ज्या नकारात्मक भावना असतील त्या तशाच अन्नात उतरतात. मग हेच अन्न खाणार्‌याचे डोके ताळयावर राहील काय? स्वयंपाकाच्या वेळी जशी आपली मानसिक वृत्ती असेल तेच संस्कार अन्नात येतील. म्हणून त्यावेळी मन प्रसन्न ठेवावे, वादविवाद टाळावा हे घरातल्या बाकीच्यांनी लक्षात ठेवावे. एकटे गृहिणीचे हे काम नाही सर्वांनी मिळून (निदान त्यावेळी) शांतिराखण्यास मदत करावी. अशा अन्नाचे मनावरील परिणाम सगळयांच्याच हिताचे असतात. काहीही पदार्थ करीत असताना, नामस्मरण करावे हा सर्वात उत्तम उपाय होय. प्रयत्नाने शक्य आहे फक्त इच्छा हवी. नामस्मरण करीत केलेल्या अन्नाने रागीट स्वभाव कमी होतो, अभिमान अहंकार कमी होतो, मनाची शांती व प्रसन्नता वाढते, नामात प्रगती होते. एकुणच संपुर्ण घरात शांती नांदू लागते वरवर पाहता हे काही जणांना पटणार नाही परंतु याचा अनुभव अनेक घरांनी घेतलेला आहे. स्त्रियांच्या अडचणीच्या दिवसात नाईलाजाने स्वयंपाक करावा लागत असल्यास ही नामस्मरण सोडू नये. नामाला पवित्र—अपवित्रता लागू नाही.

अन्नाची शुद्धी

नाईलाज म्हणून बाहेरून टिफीन, हॉटेलचे खाणे लागत असल्यास शक्यतो घरी आणून भावनेने देवाला अर्पण करून खावे. हॉटेल, ढाबा इकडेच खाण्याचा प्रसंग आला तर खाण्या अगोदर तेरा वेळा श्री राम जय राम जय जय राम म्हणून मग खावे. विरक्त, संन्यासी यांना प्रणवाचे चिंतन करीत मौन ठेवून आलेली भिक्षा—मधुकरी भक्षण करण्याचे शास्त्राचे सांगणे आहे. अन्नाचे दोष याने जातात (फक्त द्रव्य दोष जाणे फारच कठीण आहे) अन्न दोष परिहारार्थ अनेक विधी असून सामान्य संसारी माणसाला श्री रामनामाचा आधार पूरेसा आहे. अन्न शुद्धीचे कांही संस्कृत श्लोक असून अन्न ग्रहणाच्या वेळी म्हणाल्यास चांगलेच आहे अन्यथा नाम तरी घ्यावे.

(२) अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे।
ज्ञानवैराग्य सिद्धयर्थं भिक्षां देहिच पार्वती।।

(२)अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्यांगतोपिवा।
यः स्मरेत्‌ पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचि।।

(३)अहं वैश्वानरोभूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌।।


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.