कोविशिल्ड लशीच्या दुष्परिणामांची माहिती जाहीर करा; तज्ज्ञांची डीसीजीआयकडे मागणी

Share This News

अस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोविशिल्ड लस सुरक्षित आणि रोगप्रतिबंध सक्षम असल्याचा दावा सीरम इन्स्टिट्यूटने केला असला तरी लशीच्या चाचण्यादरम्यान झालेल्या दुष्परिणामांबाबतची माहिती लपविल्याचा आक्षेप तज्ज्ञांनी केला आहे. तसेच केंद्रीय औषध महानियंत्रक विभागाने (डीसीजीआय) ही प्रक्रिया पारदर्शी करत संपूर्ण माहिती जाहीर करावी, अशी मागणीही या तज्ज्ञांनी केली आहे.

करोना प्रतिबंध कोविशिल्ड लस टोचल्यानंतर चेन्नईतील चाळीस वर्षीय स्वयंसेवकाच्या मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणाची औषध महानियंत्रक व संस्थात्मक नैतिकता समिती चौकशी करत असल्याचे अधिकृतरित्या भारतीय वैद्यकीय परिषदेने रविवारी जाहीर केले. मात्र, यानंतर दोनच दिवसात संबंधित नैतिकता समितीला या घटनेविषयी कळविले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर समितीने मंजुरी दिल्यानंतरच पुन्हा चाचण्या सुरू केल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने मंगळवारी जाहीर केली आहे. याचा अर्थ या घटनेनंतर चाचण्या थांबविल्या होत्या. परंतु आत्तापर्यंतच्या माहितीनुसार लशीच्या चाचण्या कधीही तात्पुरत्या काळासाठी थांबविलेल्या नाहीत. चाचण्याचा प्रमुख उद्देश हा सुरक्षितता आहे. सीरमकडून दिल्या जाणाऱ्या निवेदनातून दिशाभूल केली जात असून विरोधाभास निर्माण होत आहे. तेव्हा चाचण्यांना परवानगी देणाऱ्या डीसीजीआयने या घटनेबाबत पारदर्शीपणे माहिती उपलब्ध करावी अशी मागणी ऑल इंडिया ड्रग अक्शन नेटवर्कने (एआयडीएएन) केली आहे.

तसेच तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असतानाच सीरमने केलेल्या खुलाशामध्ये पहिल्याच वाक्यात ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिबंध असल्याचा दावा केला असून चाचण्यांची सुरक्षितता अजूनही तपासणीच्या प्रक्रियेत असल्याचेही एआयडीएएने स्पष्ट केले आहे.

भारतातील चाचण्यांबाबत पारदर्शकता बाळगळली नाही

चाचण्यांदरम्यान झालेल्या दुष्परिणामांची माहिती संबंधित व्यक्तीने जाहीर केली. त्यानंतर सीरमने हा दावा फेटाळून देखील लावला. परंतु या प्रकरणी अधिकृतरित्या डीसीजीआयने कोणतेही उत्तर दिलेले नाही. ऑक्सफर्डच्या परदेशात झालेल्या चाचण्यांमध्ये आढळलेले दुष्परिणाम जाहीर केले गेले. त्यानंतर चाचण्या थांबवून आवश्यक प्रक्रिया केल्यावर पुन्हा सुरू देखील करण्याचे घोषित केले. मग भारतातील चाचण्यांबाबत ही पारदर्शकता का बाळगळली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लशीच्या सुरक्षिततेबाबत अविश्वास निर्माण होण्याची शक्यता

करोना साथीच्या काळात ही लसनिर्मिती महत्त्वाचा टप्पा असून यासंबंधी अनेक बाबी जोडलेल्या आहेत. परंतु या प्रकरणी केवळ कंपनी माहिती देत असून डीसीजीआय प्रत्युत्तर देत नसल्याने साशंकता निर्माण होत आहे. या वादामुळे भविष्यात जनतेमध्ये लशीच्या सुरक्षिततेबाबत अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा लशीबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी चाचण्यांची प्रक्रिया पारदर्शी असणे आवश्यक असल्याचे संशोधक आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ बायोएथिक्सचे माजी अध्यक्ष डॉ. अनंत भान यांनी व्यक्त केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.