राठोडांच्या जागेवर जयस्वालांच्या नावाची चर्चा
नागपूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव चर्चेत आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा मातोश्री येथे सादर केला आहे. मंत्रिमंडळातून राठोड यांची गच्छंती झाल्याने विदर्भातील विशेषत: पश्चिम विदर्भातील शिवसेनेच्या गढाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राठोड यांच्या जागेवर मंत्रिमंडळात शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
संजय राठोड हे बंजारा समाजातील मोठे नेते असून ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेला मोठे यश मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र पूजा चव्हाण प्रकरणावरून विरोधकांनी कोंडीत पकडल्याने राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. राठोड यांच्या रिक्त पदावर कुणाची वर्णी लागेल यासंदर्भातील चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात सुरू आहे. अशात मातोश्रीवर रामटेक मतदार संघातील आमदार आशिष जयस्वाल यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले. मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील असे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
कोण आहेत जयस्वाल?
आशिष जयस्वाल हे नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. रामटेक विधानसभा मतदार संघातून ते शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करतात. यापूर्वी त्यांनी १९९९, २००४, २००९ मध्ये याच मतदार संघातून विजय मिळविला आहे.
भाजपला धक्का
आशिष जयस्वाल यांची मंत्रिमंडळात नियुक्ती झाल्यास शिवसेना भाजपला नागपुरात मोठी टक्क देऊ शकते. शिवसेनेच्या गोटातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करून त्यांना भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याची जबाबदारी सोपविली आहे. अशात जयस्वाल यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास देवेंद्र फडणवीस व पर्यायाने नागपुरातील भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न शिवसेना जयस्वाल यांच्या माध्यमातून करू शकते असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जयस्वाल यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी, यासाठी शिवसेनेतील एग गट सक्रिय आहे.