फक्त लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला विरोधी पक्ष हवेत की काय?- मुनगंटीवार

Share This News

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आघाडी सरकारला ठणकावले

नागपूरः कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील आघाडी सरकारकडे कसल्याच प्रकारचे नियोजन नाही. या सरकारला केवळ लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठीच विरोधी पक्षांची मदत हवी आहे काय, असा संतप्त सवाल माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

राज्यातील परिस्थिती गंभीर असून सरकार कठोर लॉकडाऊनचा विचार करते आहे. मात्र, त्यानंतरच्या उपाययोजना काय आहेत, असा सवाल उपस्थित करून मुनगंटीवार म्हणाले की, राज्यभरात इंजेक्शन, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालये उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या सर्व आवश्यक बाबींची सरकारकडे काय नियोजन आहे. लसीकरणाचे सरकारकडे काय नियोजन आहे. गेल्यावर्षी ४ मे रोजी वित्त विभागाने पदभरतीला मान्यता दिली. खरे तर वित्त विभाग सहजासहजी मान्यता देत नाही. वैद्यकीय अधिकारी, बीएएमएस डॉक्टर्स, इतर कर्मचारी, सफाई कामगार यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. या लोकांचा आम्ही कोव्हीड योद्धे म्हणून सन्मान केला. आम्ही नेतेमंडळी अतिशय सावधगिरी बाळगून राहतो. पण गरीबांचे काय? चंद्रपूरमध्ये ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी सात महिने सेवा दिली, त्यांचे मानधन देखील आम्ही तांत्रिक कारण दाखवून अडवून ठेवले आहे. यावर सरकार चिंतन, मनन करणार की नाही. विद्यार्थ्यांबाबत सरकारची काय भूमिका आहे. दहावी, बारावीचे विद्यार्थी यांच्या भवितव्याचे काय होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील गरीबांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना पॅकेज जाहीर करणे आवश्यक होते. सरकारने आमदार निधी वाढविला. आम्ही त्या निर्णयाचे स्वागत केले. पण दुसरीकडे सरकारकडून गरीबांची थट्टा सुरु आहे. त्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. ही लोकशाही गरीबांच्या खांद्यावर आहे, असे परखड बोलही मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सुनावले आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.