गरज नसेल तर घराबाहेर पडू नका : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
नागपूर : नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडूच नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सोबतच सोमवारपासून चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येत असून ‘सुपर स्प्रेडर’ असणाऱ्या घटकांना तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालय, अनिर्बंध वागणाऱ्या नागरिकांवर आता सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेत शनिवारी घेण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये सोमवारपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक वितरण व सेवेत सहभागी असणारे (सुपर स्प्रेडर) अर्थात अनेकांच्या संपर्कात येणारे भाजीवाले, दुधवाले, सलून, घरकाम करणाऱ्या महिलांच्या चाचण्यांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी विनामास्क बाहेर पडू नये, विनामास्क बाहेर पडणाऱ्यावर सक्त कारवाई करा, असेही स्पष्ट केले आहे. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, डॉ. असीम इमानदार आदी उपस्थित होते.