डॉ . कोलवाडकर यांच्या आयुष्य : एक कॅलिडोस्कोप’चे प्रकाशन

Share This News

नागपूर , दिनांक २० डिसेंबर ” डॉ . प्रमोद कोलवाडकर ह्यांच्या कथा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील सच्च्या अनुभवांचे कथन आहे . त्या केवळ कथा नसून त्यात मानवी स्वभावाचे अनेक बारकावे दिसतात . मराठी कथेत वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांची अशी मांडणी करणारे डॉ . कोलवाडकर हे उत्तम कथाकार आहेत . ” असे उद्गार श्री . भास्कर लोंढे यांनी काढले . डॉ . प्रमोद कोलवाडकर ह्यांनी लिहिलेल्या या आयुष्य : एक कॅलिडोस्कोप ‘ कथासंग्रहाचे प्रकाशन श्री . भास्कर लोंढे ह्यांचे हस्ते रविवारी रामदासपेठमधील हॉटेल सेंटरपॉईंट येथे संपन्न झाले , त्या वेळी ते बोलत होते . साहित्य प्रसार केंद्राने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ . मधुकर आपटे होते . डॉ . कोलवाडकर , सुधीर पाठक व प्रकाशक मकरंद कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते . आपल्या भाषणात भास्कर लोंढे म्हणाले की , “ कोलवाडकरांच्या कथा अत्यंत सहज आणि प्रासादिक आहेत . अनेक नवीन विषयांना त्यांनी स्पर्श केला आहे . बहुतांश कथांचा अंत हा सुखांत आहे , परंतु एका कथेचा अंत हा दुःखांत आहे .

त्यामुळे आज ते खऱ्या अर्थाने कथालेखक झााले असे म्हणायला हरकत नाही . ” भास्कर लोंढे ह्यांनी कथासंग्रहातील काही कथांची वैशिष्ट्येही उलगडून दाखविली . आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ मधुकर आपटे म्हणाले की , “ डॉ . कोलवाडकर ह्यांच्या कथांचा मी पूर्वीपासून वाचक आहे . मानवी मनाचे आणि समाजाचे प्रतिबिंब तर त्यात दिसतेच , परंतु कथांचे वैशिष्ट्य असे की , त्यात हाताळलेले विषय हे नेहमीपेक्षा वेगळे असतात . डॉ . कोलवाडकर ह्यांच्या कथांमधून त्यांचे समाजशील मन दिसून येते . ते स्वतः रेडिओलॉजिस्ट असल्याने मानवी स्वभावाची क्ष – किरण तपासणीच त्यांनी केली आहे . ‘ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरुण भारताचे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार श्री . सुधीर पाठक यांनी केले . त्यावेळी त्यांनी डॉ . कोलवाडकर यांचे विशेष अभिनंदन करताना सांगितले की यावर्षी कोविड -१ ९ च्या प्रभावात अनेक दिवाळी अंक प्रकाशित होऊ शकले नाहीत तरीदेखील डॉ . कोलवाडकरांच्या एकूण १४ दिवाळी अंकांतून कथा प्रकाशित झाल्या आणि हा विदर्भातला एक विक्रमच आहे असे म्हटले तर अतिशोक्ती ठरू नये . यापूर्वी १ ९ ८३ साली प्रख्यात कथा लेखिका आशाताई बगे यांच्या कथा एकाच वर्षात १२ दिवाळी अंकांतून प्रकाशित झाल्या होत्या तो विक्रम यंदा डॉ . कोलवाडकर यांनी मोडला आहे . तसेच यंदाच्या कथांद्वारे त्यांनी कथांचे शतकही पूर्ण केले आहे . कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ . प्रमोद कोलवाडकर ह्यांनी सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले . आपल्या कथासंग्रहामागील भूमिका त्यांनी स्पष्ट करून मनोगत व्यक्त केले . मकरंद कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शनात डॉ . कोलवाडकर यांचे अभिनंदन करताना सांगितले की साहित्य प्रसार केंद्राच्या दोन लेखकांनी मराठी साहित्य क्षेत्रात स्वत : चे असे एक वेगळे दालन निर्माण केले आहे . एक म्हणजे सुविख्यात निसर्गलेखक मारुती चितमपल्ली यांनी निसर्गलेखनाचे एक नवीन दालन निर्माण केले तर डॉ . प्रमोद कोलवाडकर यानी वैद्यकीय क्षेत्रातील सत्यघटनांवर आधारित हृदयस्पर्शी कथांचे नवे दालन निर्माण केले आहे . साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते . “


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.